आढावा बैठकीत खासदार रवींद्र चव्हाण यांची आग्रही भूमिका
नांदेड-नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे सोळा तालुक्यात अत्यल्प पावसामुळे परिस्थिती चिंताजनक आहे शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत करणे गरजेचे असून शासनाने वेळ न घालवता संपूर्ण नांदेड जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून त्वरित घोषित करावा अशी आग्रही भूमिका खासदार रवींद्र चव्हाण यांनी आढावा बैठकीत घेतली.
संपूर्ण मराठवाड्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत खासदार रवींद्र चव्हाण यांनी विविध मुद्दे उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. सोयाबीन शेंगा भरणीच्या वेळेलाच पावसाने खंड दिल्यामुळे संपूर्ण सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे एवढेच नव्हे तर इतर पिके व फळबागाही धोक्यात असून शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या बैठकीत सादर केलेली माहिती अत्यंत योग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील अनेक भागात पाणी उपलब्ध असूनही खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपंपाद्वारे पाणी देणे शक्य होत नाही, नायगाव उमरी धर्माबाद तसेच कंधार लोहा सारख्या तालुक्यात ज्या ठिकाणी उपलब्ध आहे तेथे वीज पंपांना किती तास वीज पुरवठा मिळणार असा प्रश्न त्यांनी ऊर्जामंत्री मेघना बोर्डीकर यांना विचारला. वीज पुरवठ्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
चौकट
दरम्यान खासदार रवींद्र चव्हाण यांनी शासकीय विश्रामगृहात कृषिमंत्री भरणे यांची भेट घेऊन त्यांना
अखिल भारतीय समन्वयित कृषि हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे हवामान बदलासाठी उत्कृष्टतेचे केंद्र स्थापन करण्यासाठी मंजूर 25 कोटींचा निधी उपलब्ध करून घेण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली.

COMMENTS