लातूर, दि. २४ सप्टेंबर :
"करुन छत्रपतींना वंदन | करुया महंत निश्चलपुरीचे स्मरण"|| आणि 'जय शिवराय', 'जय निश्चलपुरी गोसावी महाराज' अशा गगनभेदी घोषणांच्या जयघोषात आज लातूर येथे दशनाम गोसावी समाज, लातूर जिल्हा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक दुसऱ्या शिवराज्याभिषेक दिनाचा गौरवशाली सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. हा ऐतिहासिक राज्याभिषेक दिन दशनाम गोसावी समाज लातूरच्या वतीने दरवर्षी नियमितपणे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
इतिहासामध्ये , २४ सप्टेंबर १६७४ (अश्विन शुद्ध पंचमी) हा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाक्त पंथाचे महान विद्वान महंत निश्चलपुरी गोसावी महाराज यांच्याकडून शास्त्रोक्त आणि शाक्त पद्धतीने आपला दुसरा ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा करून घेतला होता. या अभूतपूर्व ऐतिहासिक घटनेचे स्मरण आणि स्मृती जागविण्यासाठी प्रतिवर्षी २४ सप्टेंबर हा दिवस दशनाम गोसावी समाज बांधव आणि तमाम शिवप्रेमी जनतेच्या वतीने अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने साजरा केला जातो.या मंगल दिनाचे औचित्य साधून देशभरातील लाखो शिवप्रेमी जनता दुर्गराज रायगड किल्ल्यावर जाऊन तिथल्या पवित्र मातीचा टिळा कपाळी लावतात आणि छत्रपती शिवरायांना सादर वंदन करून महंत निश्चलपुरी गोसावी महाराज यांचे मनोभावे स्मरण करतात.
लातूर दशनाम गोसावी समाजाची परंपरा -
याच ऐतिहासिक परंपरेचा भाग म्हणून लातूर जिल्हा दशनाम गोसावी समाजाच्या वतीने आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी आणि शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज व महंत निश्चलपुरी गोसावी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. लातूर जिल्ह्यात समाज बांधवांना एकत्र आणून हा सण साजरा करण्याची परंपरा समाजाने अविरतपणे जपली आहे.
या गौरवशाली सोहळ्याप्रसंगी लातूर जिल्ह्यातील दशनाम गोसावी समाजातील प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने डॉ. धर्मवीर भारती, विनायक गिरी, प्रमोद बन, राजाभाऊ गिरी, भाऊगीर गिरी, व्यंकटेश पुरी, पद्माकर गिरी, अशोक गिरी, धनराज गिरी, शहाजी राजे गिरी, आणि गोसावी मोतीबुवा यांचा समावेश होता. तसेच युवा पिढीचे प्रतिनिधित्व म्हणून कु. वेदिका गिरी आणि चि. पवन गिरी यांचीही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांनी यावेळी ऐतिहासिक आठवणींना उजाळा देत समाज आणि संस्कृती जोपासण्याचा संकल्प केला.

COMMENTS