बिलोली : शिवराज रायलवाड, बिलोली तालुक्यातील दौलापूर येथे मनरेगांतर्गत मंजूर विहिरींच्या कामांबाबत तक्रारी झाल्यानंतर पंचायत समितीचे चौकशी पथक गावात दाखल झाले. तक्रारदाराच्या गट क्रमांक ७२ (अ) मध्ये प्रत्यक्ष पाहणी केली असता मंजूर ठिकाणी विहीर आढळून न आल्याने या प्रकरणातील संशय अधिक गडद झाला आहे. पाहणीदरम्यान संबंधित रोजगार सेवकांनी दौलापूर रस्त्यालगत असलेल्या पाणी वाहणाऱ्या नाल्याची जागा दाखवत याच ठिकाणी विहीर खोदण्यात आल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता संबंधित ठिकाणी विहीर नसून मोठा पाण्याचा नाला असल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चौकशी पथकासमोरच रोजगार सेवकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दौलापूर येथील काही शेतकऱ्यांच्या नावावर विहिरी मंजूर झाल्याचे कागदोपत्री दाखविले जात असले, तरी प्रत्यक्ष शेतात विहीर खोदण्यात आलेली नसल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समितीच्या पथकाने संबंधित गट क्रमांकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
विहीर मंजूर, कामाची नोंद; मग विहीर गेली कुठे? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मंजूर गट क्रमांकाऐवजी अन्य ठिकाणचा नाला विहीर म्हणून दाखविण्यात आला असल्याचा आरोप खरा ठरल्यास कागदोपत्री नोंदी आणि प्रत्यक्ष कामातील तफावत गंभीर ठरू शकते.या प्रकरणात रोजगार सेवकासोबत ग्रामसेवक आणि संबंधित अभियंत्याची भूमिका काय होती, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. संबंधित विहिरीचे मस्टर, मोजमाप पुस्तिका, जिओटॅग छायाचित्रे, कामाच्या नोंदी आणि प्रत्यक्ष स्थळ यांची पडताळणी केल्यास या प्रकरणातील वास्तव स्पष्ट होऊ शकते.दरम्यान, चौकशीदरम्यान मंजूर विहिरीऐवजी नाल्याची जागा दाखविण्यात आल्याचा आरोप असल्याने विहिरीच्या नावावर नेमके काय झाले? हा प्रश्न दौलापूरकरांकडून उपस्थित केला जात आहे.चौकशीत अनियमितता अथवा संबंधितांची जबाबदारी निश्चित झाल्यास नियमानुसार कारवाई होणार का, याकडे दौलापूरसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS