नूतन विद्यालय सेलू येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
-आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंचा सत्कार
सेलू (प्रतिनिधी) : नूतन विद्यालय सेलू येथे २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ‘खेलेगा भारत-जितेगा भारत’ या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू तसेच प्रशिक्षकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे डॉ. एस. एम. लोया होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ. आशिष डख, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध नाईक, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिल्हा संघटक दिनकर वाघ, तालुकाध्यक्ष गणेश काटकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, प्रभारी मुख्याध्यापक डी. बी. घोगरे, पर्यवेक्षक एस. जी. बोधनापोड व जी. एस. माळवे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ‘खेळ खेळूया, देशाची शान वाढवूया’ या स्वागतगीताने झाली. त्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक गणेश माळवे यांनी केले. यावेळी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अजय नारायणराव चव्हाण यांचा ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय लॅक्रास स्पर्धेतील सहभागाबद्दल, तसेच कु. आद्या महेश बाहेती हिचा इंग्लंडमधील टेबल टेनिस वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू आणि प्रशिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. आशिष डख यांनी, “खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून तो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. खेळामुळे शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाला योग्य स्थान मिळाले पाहिजे,” असे प्रतिपादन केले. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनीही विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने प्रयत्न करून आपल्या शाळेचे, गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. एस. एम. लोया यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. काशीनाथ पल्लेवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत नाईक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभागप्रमुख प्रशांत नाईक, संजय भुमकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने झालेल्या या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली.

COMMENTS