लोहा | प्रतिनिधी लोहा शहरातील कंधार रोड परिसरातील जायकवाडी वसाहतीमध्ये मागील सुमारे ३५ वर्षांपासून असलेल्या पंचरंगी ध्वजाचा मे महिन्यात काही...
लोहा | प्रतिनिधी
लोहा शहरातील कंधार रोड परिसरातील जायकवाडी वसाहतीमध्ये मागील सुमारे ३५ वर्षांपासून असलेल्या पंचरंगी ध्वजाचा मे महिन्यात काही समाजकंटकांनी काढून टाकल्याच्या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे बौद्ध अनुयायांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
पंचरंगी ध्वज पूर्वीच्या ठिकाणी पुन्हा स्थापित करण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीसह समविचारी पक्षांच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने दोन दिवसांपूर्वी बौद्ध अनुयायांनी ध्वजाची पुन्हा स्थापना केली. त्यानंतर परिसरातील वातावरण पुन्हा तापले असून, ध्वजाच्या सुरक्षेसाठी नागरिकांकडून रात्रंदिवस पहारा देण्यात येत आहे. तसेच पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी काल जायकवाडी येथील पंचरंगी ध्वजाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी प्रशासनाला ध्वज न काढण्याचा इशारा दिला.
याच वेळी समाजभूषण पुरस्कार विजेते बी.बी. गायसमुद्रे यांनी मागील ३५ वर्षांपासून ध्वज अस्तित्वात असल्याबाबतचे विविध कागदोपत्री पुरावे आनंदराज आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केले. या पुराव्यांमुळे ध्वजाबाबतची नागरिकांची बाजू अधिक भक्कम झाल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.
यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी ध्वजाच्या प्रश्नावर प्रशासनाने योग्य ती भूमिका घ्यावी, अशी भूमिका मांडली. तसेच समाजातील नागरिकांनी शांतता व संयम राखून कायदेशीर मार्गाने आपली भूमिका मांडावी, असे आवाहन केले.
आनंदराज आंबेडकर यांच्या भेटीनंतर जायकवाडी परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. पंचरंगी ध्वज त्याच ठिकाणी कायम राहावा, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन नागरिकांनी त्यांना दिले.
दरम्यान, बी.बी. गायसमुद्रे यांनी ध्वजासंदर्भातील उपलब्ध कागदोपत्री पुरावे सुपूर्द केली . आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि पुढील कार्यवाही काय होते, याकडे लोहा शहराचे लक्ष लागले आहे.

COMMENTS