किनवट : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरील गोकुंदा येथील रेल्वे फाटक क्रमांक ११च्या ठिकाणी प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाचा (ROB) प्रश्न तब्ब...
किनवट : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरील गोकुंदा येथील रेल्वे फाटक क्रमांक ११च्या ठिकाणी प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाचा (ROB) प्रश्न तब्बल आठ वर्षांपासून रखडला आहे. या प्रकरणी आता रेल्वे बोर्डाने आमदार भीमराव केराम यांना पत्र पाठवून प्रकल्पाची सद्यस्थिती स्पष्ट केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 1(PWD) सुधारित सामान्य व्यवस्था आरेख (GAD) प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार असल्याचे रेल्वे बोर्डाने कळविले आहे.गोकुंदा रेल्वे फाटकावर रेल्वेगाडी येताच दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होते. त्यामुळे वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. राष्ट्रीय महामार्गावरील हे महत्त्वाचे रेल्वे क्रॉसिंग असल्याने येथे ROB उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
या प्रश्नासाठी आमदार भीमराव केराम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर रेल्वे बोर्डाने ३१ जुलै रोजी काढलेल्या कार्यालयीन पत्रातून प्रकल्पाच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे.
रेल्वे बोर्डाच्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०२४ रोजी रेल्वे व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली होती. त्यानंतर तयार करण्यात आलेल्या Conceptual Plan ला १६ ऑक्टोबर २०२५ रोजी काही अटी व टिप्पण्यांसह रेल्वेने मंजुरी दिली. त्यानंतर प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेसाठी General Arrangement Drawing (GAD) सादर करण्याची सूचना करण्यात आली.
मात्र, सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुधारित GAD अपेक्षित असल्याचे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे PWDने सुधारित आराखडा तातडीने सादर केल्यास प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.
आमदार केराम यांचा पाठपुरावा
गोकुंदा ROBच्या प्रश्नावर आमदार भीमराव केराम यांनी रेल्वे प्रशासनासोबतच राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाकडेही पाठपुरावा केला आहे. २३ जुलै २०२६ रोजी त्यांनी आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. त्याचा संदर्भ देत रेल्वे बोर्डाने आयोगालाही पत्राची प्रत पाठविली आहे.
आता PWDकडे नजर
रेल्वे बोर्डाने प्रकल्पाच्या प्रक्रियेतील अडथळा स्पष्ट केल्याने आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुधारित GAD कधी सादर होतो, याकडे किनवटवासीयांचे लक्ष लागले आहे. आठ वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला आता तरी गती मिळून गोकुंदा रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
.jpg)
COMMENTS