राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत कुप्पम येथे विशेष प्रशिक्षण प्रयोगाधारित व कृतीशील अध्यापनावर भर
नांदेड : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणित विषयाची गोडी निर्माण व्हावी, तसेच अध्यापन प्रक्रियेत कृतीशील, प्रयोगाधारित आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा प्रभावी वापर वाढावा, या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांनी आंध्र प्रदेशातील कुप्पम येथील अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन येथे विशेष प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून शिक्षकांचे नांदेड येथे आगमन झाले.
या प्रशिक्षणामध्ये विज्ञान व गणित विषयातील विविध संकल्पना प्रयोग, कृती, शैक्षणिक मॉडेल्स आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याच्या प्रभावी पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षणशक्ती, चिकित्सक विचार, तर्कशक्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यासाठी विविध कृती व उपक्रम शिक्षकांना प्रत्यक्ष करून दाखविण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांनी विविध वैज्ञानिक प्रयोग, गणितीय संकल्पनांचे कृतीद्वारे स्पष्टीकरण, शैक्षणिक साहित्याची निर्मिती व त्याचा अध्यापनातील वापर यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यामुळे पारंपरिक अध्यापनासोबतच ‘करून शिकणे’ आणि ‘अनुभवातून शिकणे’ या पद्धतींचा प्रभावी वापर करण्यासाठी शिक्षकांना नवी दिशा मिळाली आहे.
प्रशिक्षणासाठी सहभागी शिक्षक
नांदेड जिल्ह्यातून या प्रशिक्षणासाठी सहभागी झालेल्या शिक्षकांमध्ये —
- घाटे बाबाराव गंगाराम — डॉ. नारायणराव भालेराव हायस्कूल, स्नेहनगर, नांदेड
- मिलिंद चांदोबा सर्जे — श्री संत बाळगिर महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कापसी (गुंफा), ता. लोहा
- हनमंत हरी सोनकंबळे — श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, ढोल उमरी, ता. उमरी
- वाघमारे रामचंद्र पिराजी — श्री शिवाजी हायस्कूल, बारूळ, ता. कंधार
- आनंद खंडेराव वळगे — पीएमश्री जिल्हा परिषद शाळा, विष्णुपरी, ता. नांदेड
- ढाके ऋषिकेश दिनानाथ — जिल्हा परिषद शाळा, वाघी, ता. नांदेड
- मनोज यादव सोनकांबळे — पीएमश्री जिल्हा परिषद शाळा, माळाकोळी, ता. लोहा
- फरहीन कहानम अबुल रऊफ खान — जिल्हा परिषद शाळा, अर्धापूर
- फरीहा बाबर अब्दुल रहमान इनामदार — जिल्हा परिषद शाळा, अर्धापूर
यांचा समावेश होता.
अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनच्या प्रशिक्षणातून आत्मसात केलेल्या विविध कृती, प्रयोग, मॉडेल्स आणि अध्यापन तंत्रांचा वापर हे शिक्षक आता आपल्या शाळांमध्ये करणार आहेत. त्यामुळे विज्ञान व गणित विषयाचे अध्यापन अधिक आनंददायी, प्रयोगशील, कृतीप्रधान आणि विद्यार्थीकेंद्रित होण्यास मदत होणार आहे.
या प्रशिक्षणामुळे शिक्षकांच्या अध्यापन कौशल्याला नवी दिशा मिळाली असून, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी तसेच गणित व विज्ञान विषयाबद्दलची भीती दूर करून जिज्ञासा वाढविण्यास हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण करून नांदेडमध्ये परतलेल्या सर्व शिक्षकांचे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. माधवराव सलगर साहेब, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. वंदना फुटाणे मॅडम, डायटचे प्राचार्य डॉ. अमोल निळेकर साहेब, डायटचे अधिव्याख्याता डॉ. प्रवीणकुमार पाईकराव सर तसेच संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS