माहूर (प्रतिनीधी) माहूर नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष फिरोज हाजी कादर दोसानी यांना त्यांच्या उत्कृष्ट लोकाभिमुख कार्याची दखल घेत लोकशाही मराठी वृत्तवाहिनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या "लोकशाही भारत लीडरशिप समिट" या प्रतिष्ठित कार्यक्रमात मुंबई येथे पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार शनिवार, दि. ६ जून रोजी आयोजित कार्यक्रमात मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
फिरोज दोसानी हे माहूर शहराच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. मागील तीन पंचवार्षिक ते नगरसेवक म्हणून जनतेची सेवा करत असून गेल्या सात वर्षांपासून नगराध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. सध्या विद्यमान नगराध्यक्ष म्हणून ते शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामे राबवत आहेत.
शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. माहूर शहर टँकरमुक्त करण्यामध्ये त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली असून प्रत्येक घरापर्यंत "नळ से जल" योजनेचा लाभ पोहोचविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. दिवंगत आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला.केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत भोजंती तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी तब्बल २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. या योजनेमुळे भोजंती तलावाचा कायापालट झाला असून शहरातील भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे. परिणामी उन्हाळ्यातही सार्वजनिक विहिरी व बोरवेलमध्ये पाणी उपलब्ध राहत असल्याने पाणीटंचाईच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात करण्यात यश आले आहे.
विकासाभिमुख दृष्टीकोन, सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांशी कायम सुसंवाद ठेवणारे नेतृत्व म्हणून फिरोज दोसानी यांची ओळख निर्माण झाली आहे. शहर विकास, पाणी व्यवस्थापन, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.माहूर शहरासाठी अभिमानास्पद ठरलेल्या या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून फिरोज भय्या दोसानी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

COMMENTS