नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात किमान आधारभूत खरेदी योजने अंतर्गत रब्बी हंगामातील भरडधान्य ज्वारी, मका, रागी या पिकांची शेतकरी नोंदणी व खरेदीसाठी केंद्रांनना मंजुरी मिळाली आहे. खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी खा.रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी नुकतेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली होती.
ज्वारीचे उत्पादन समाधानकारक झाले असतानाही योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होत असल्याने शासन स्तरावरून ज्वारी खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून शेतकर्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे अशी मागणी खा.चव्हाण यांनी आपल्या निवेदनात केली होती. नांदेड जिल्ह्यात ज्वारी हे एक प्रमुख पीक असून यावर्षी ज्वारीचे उत्पादन समाधानकारक झाले आहे. तथापि, शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनास योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे नमुद करून चव्हाण नांदेड हा जिल्हा मोठा असतानाही शासन स्तरावरून अद्याप एकही ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने जिल्हाधिकार्यांना पाठविलेल्या एका पत्राद्वारे जिल्ह्यात ज्वारी, मका रागी खऱेदी केंद्रांना मंजुरीसाठी प्रस्तावित केले आहे. भरडधान्य खऱेदीसाठी शासन निर्णयास अनुसरून शेतकरी नोंदणी 15 मे पर्यंत आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांना आधारभूत खरेदी योजने अंतर्गत मंजुरी दिल्याचे जिल्हा पणन अधिकारी आर.जी.गव्हाणे यांनी पत्रात नमूद केले आहे.खा.रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे ज्वारी खरेदी केंद्र सुरु करण्यात आल्यामुळे उत्पादक शेतकर्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

COMMENTS