डॉ. मंदा खांडगे हे मराठी बालसाहित्यातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी बाळगोपाळांसाठी विपुल लेखन केले आहे.
माकडवाला जगू, दूरदेशीच्या बालकथा, मित्रप्रेम, दोडी, चिचू, एकांडा, वृक्षमित्र, पावरी, मामाचा वाडा चिरेबंदी, पक्षीमित्र, आधार, जुई, पहाडबाबा, उंटांचा तांडा, हिरवे जग, गोष्ट एका चिनूची, बगळ्यांचं झाड, हेमलकसाचे सांगाती, डिंगोरी, खेळण्यांच्या राज्यात, मॉली, जंगलातलं गुपित, केशवसुत, जोतिर्मयी, गुलब्या, मांझी अशी त्यांची तीसेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याशिवाय त्यांनी बालसाहित्य आणि बालशिक्षणाविषयी संशोधनपर, सखोल चिंतनात्मक असे लेखन केले आहे. त्यांचे हे लेखन ह्या दोन्ही क्षेत्रांत काम करणाऱ्यांसाठी दिशादर्शक ठरले आहे.
डॉ. मंदा खांडगे यांचा 'वेडगाणी' हा नवीन बालगीतसंग्रह संस्कृती प्रकाशनाच्या संचालिका सुनिताराजे पवार यांनी अतिशय आकर्षक स्वरूपात प्रकाशित केला आहे. 'वेडगाणी' ह्या शीर्षकाचा अर्थ 'वेड्यांची गाणी' किंवा 'वेड्यांसाठी गाणी' असा नसून 'वाचकांना वेड लावणारी गाणी' असाच आहे. नावाप्रमाणेच ही गाणी बाळगोपाळांना नादाचे आणि कल्पनारम्यतेचे वेड लावणारी आहेत. ३२ पृष्ठांच्या ह्या संग्रहात बडबडगीतांच्या स्वरुपातील २३ बाळगाणी आहेत. ह्या कवितांचे विषयसुद्धा नेहमीच्या बालकवितेतील विषयांपेक्षा जरा वेगळे आहेत. कवयित्रीच्या मनाच्या अंगणात उगवलेली ही कवितेची हिरवीगार वेल विविधरंगी फुलांनी बहरलेली आहे.
'आपडी-थापडी' ह्या पूर्वापार चालत आलेल्या बडबडगीतात पुढे नेहमी 'गुळाची पापडी' येते. गुळाची पापडी ही सर्वसामान्य आणि सर्वमान्य अशी गोष्ट आहे. यात विशेष काहीच नाही. मंदाताईंच्या कवितेत 'आपडी-थापडी'नंतर येते ती 'थापाडी पापडी'. निर्जीव पापडीवर ती थापाडी असल्याचा मानवी गुणाचा आरोप केला, की बाळगोपाळांना मज्जा येते.
'कुणाचं काय तर कुणाचं काय
गोगलगायीचे पोटात पाय'
किंवा
'कुणाचं काय तर कुणाचं काय
वटवाघळाला दिवसा दिसतच नाय'
असाही अनुभव इथे येतो.
ह्या कवितेत एक कवडसा भेटतो. उन्हाचा कवडसा म्हटल्यावर तो उनाडच असणार ना!
हा कवडसा लपाछपीचा खेळ खेळतो. हा सोनरंगी कवडसा बघणा-याच्या जीवाला भूल पाडतो. हा कवडसा मुठीत पकडायला बाळगोपाळांना फारच आवडते, पण तो गवसत नाही. त्याचा लपंडाव नेहमी आनंददायी असतो.
'टिंबकटू' हे गमतीदार असे एका मुलाचे नाव आहे. याला हसायला काहीच कारण लागत नाही. गणिताचा पेपर फुटला, तरी हा हसतो आणि कागदावरची शाई फुटली तरी हा हसतो.
एके दिवशी शाळा सुटली, पाटी फुटली आणि टिंबकटूची चड्डी सुटली. खरं तर चड्डी सुटल्यामुळे टिंबकटूची फजिती झाली, तरीसुद्धा टिंबकटू हसत सुटला, कारण त्याला हसायला निमित्तच लागतं. आपल्याच फजितीवर हसायला हिंमत लागते. असा भोळाभाबडा, गमतीदार टिंबकटू आपल्याला फक्त मंदाताईंच्या कवितेतच सापडतो. असा टिंबकटू शोधायला ती दृष्टी असावी लागते. ती दृष्टी मंदाताईंना लाभलेली आहे. कवितेतला निष्पाप आणि निरागस मिश्कीलपणा बच्चेकंपनीला फारच आवडतो. म्हणूनच ही कविता बाळगोपाळांना हवीहवीशी वाटते.
पेडगावचे पाहुणे हे सगळेच अतिशहाणे. त्यातले काही तर दीडशहाणे आहेत. पेडगावचे पाहुणे एकदा वेडगावात गेले. ते पोट धरून पाहुण्यांवर रागावतात आणि रडतरडत हस्तांदोलन करतात. असे हे आगळेवेगळे पाहुणे. वेडगावचे लोक आणखी वेगळेच आहेत.
'वेडगावात आहेत। सगळेच कवी
देत नाहीत कधी। कुणालाच शिवी'
हे मात्र छान आहे! शिव्या देण्यापेक्षा कविता म्हणणे केव्हाही चांगलेच!
वेडगावच्या लोकांचा हा चांगला गुण आपणही घ्यायला हरकत नाही.
'झुळूक' हे एक अफलातून कथाकाव्य आहे. कवितेत पहिली झुळूक आली आणि सोपान नावाच्या मुलाची टोपी उडवून घेऊन गेली. सोपान बिचारा टोपीच्या मागे धावतच राहिला. दुसरी झुळूक आली आणि टोपी उडून झाडावर जाऊन बसली. तिसरी झुळूक आली आणि तिने झाडावरची टोपी अलगद सोपानच्या डोक्यावर आणून ठेवली. सोपान आनंदाने फेर धरून झुळकीसोबत नाचायला लागला. अशी खट्याळ आणि तरीही लडिवाळ झुळूक कोणालाही आवडेल. पण इतकी गमतीदार झुळूक फक्त मंदाताईंच्या कवितेतच सापडते. मंदाताईंच्या कवितेची ही हळुवार झुळूक बालमनाला सुखावून जाते.
लहान मुलांच्या छोट्या डोक्यात वेगवेगळे, मोठमोठे प्रश्न पडत असतात.
समजा, एखाद्या दिवशी सूर्य रजेवर गेला तर?
वारा दूर देशात हद्दपार झाला तर?
घड्याळाचे काटे उलटे फिरले तर?
सगळेच सिग्नल बंद पडले तर?
माणसं खाली डोकं आणि वर पाय करून चालायला लागली तर?
समुद्राच्या लाटा फुटून कुठे जात असतील?
लाटांचे घर कुठे असेल?
किती मजले बांधल्यावर आभाळाला हात लागेल?
आभाळाला हात लावल्यावर ढग गडगडतील का?
ढग गडगडले, तर पाऊस पडेल का?
बालमित्रांनो, तुम्हालाही असे प्रश्न पडत असतीलच ना? जर तुम्हालाही असे प्रश्न पडत असतील, तर तुम्हीही हुश्शार आहात!
आपल्याला वेगवेगळे चहा माहीत आहेत. नामवंत चहाचा सगळीकडे बोलबाला आहे. 'चहा स्पेशालिस्ट' ह्या कवितेत आपल्याला एक फक्कड चहा बनवणारी स्पेशालिस्ट चिऊताई भेटते. तिच्या चहाची कीर्ती गावभर पसरली आहे. तिच्या चहाचा आस्वाद अनेक पशुपक्ष्यांनी घेतला आहे. म्हणून मंदाताई म्हणतात :
'चहा स्पेशालिस्ट चिऊताईंचा चहा
कसा लागतो, एकदा पिऊन तर पाहा'.
अशा भन्नाट कल्पना फक्त मंदाताईंनाच सुचू शकतात.
मंदाताईंच्या कवितेत गंमतपूर नावाचे एक गाव आहे. गावाच्या नावातच गंमत असल्यामुळे तिथे गमतीजमती तर घडणारच.
'गंमतपूरच्या राणीचा न्याराच थाट
तिच्या गंमत महालात
लावलेत दिवे एकशे साठ'.
ह्या राणीने आपल्या केसांत बकुळीची सात फुले माळली आहेत. भांगात चांदीचा चुरा भरला आहे. त्यावर पोवळ्यांची रास लावली आहे. राणीच्या शालूच्या पदरावर काजव्यांचा नाच चाललेला आहे. अशी ही राणी हरणांच्या ऐनेदार बग्गीत बसून गाणी गात फिरते आहे.
आसामच्या जंगलातील सैनिकांच्या कॅंपमध्ये एका रात्री एक हत्ती शिरतो. तिथल्या पिंपातली दारू पिऊन तो रात्रभर धुमाकूळ घालतो. चूक लक्षात आल्यावर, सकाळी सैनिकांना झोकात सलामी देऊन 'सॉरी बॉस' म्हणतो.
बालभावविश्वात अशा गमतीजमती सहज घडतात. ह्या गमतीजमती बालमनाला कमालीचा आनंद देतात. तो आनंदाचा ठेवा ह्या कवितेत सापडतो.
मंदाताईंच्या कवितेत आपल्याला अतिशय बिलंदर आणि कलंदर अशी काही पात्रे भेटतात. तिंबूनाना बारकुंडे हे त्यापैकीच एक. ह्या तिंबूनानांना तपकीर ओढायची सवय आहे. थोडी थोडकी नव्हे, तर ते आपल्या नाकात शेरभर तपकीर कोंबतात आणि सटासट शिंकत गल्लीभर फिरत राहतात. एके दिवशी तिंबूनानांना सर्दी झाली आणि त्यात सगळी तपकीर वाहून गेली. बालसाहित्यात इतकी अतिशयोक्ती सहज खपून जाते. कवितेचा समारोप करताना मंदाताईंनी लिहिले आहे :
'तेव्हापासून तिंबूनानांची तपकीर सुटली
तिंबूनानींनी मग गावभर साखर वाटली'.
तिंबूनानांची तपकीर सुटल्यावर तिंबूनानींना किती आनंद झाला असेल, याची आपण कल्पना करू शकतो.
पिढी, दरपिढी बालकुमारांच्या कल्पना, स्वप्नं, अपेक्षा, भावभावना आणि विचार सतत बदलत असतात. नवीन पिढीतील मुलामुलींना जुन्या गोष्टींत आता गम्य वाटत नाही. त्यांचे भावविश्व आणि अनुभवविश्व आता खूपच बदलले आहे. संगणकाचा अवतार असलेला मोबाईल त्यांच्या हातात आला आहे. साक्षात 'गूगलबाबा' त्यांच्या मदतीला आला आहे. आता त्यांच्या बोटावर सगळे जग नाचत आहे. अशा प्रगत पिढीला 'चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक' ही गोष्ट कालबाह्य वाटणार. म्हणून आता आम्हाला ही गोष्ट बदलून सांगावी लागणार आहे. मंदाताईंनी ह्या कथाकाव्यात काळानुरूप बदल केला आहे. आजच्या काळातील म्हातारी भोपळ्यात बॉंब ठेवला आहे, असे सांगते. ते ऐकल्यावर वाघोबा धूम पळून जातात आणि म्हातारी ऐटीत निघून जाते. हे नवकथन मुलामुलींना नक्कीच आवडेल.
बदलत्या काळानुसार आता बडबडगीतांचे मुखडेही बदलले आहेत. आताची मुलं जुनी बडबडगाणी गुणगुणत नाहीत.
'ॲडी गो मॅडी गो गो गो गो' हा नवीन मुखडा आता बाळगोपाळांच्या ओठांवर खेळतो आहे. 'ॲडी गो मॅडी गो' ह्या कवितेत आपल्याला डासोपंत गुणगुणे भेटतात. त्यांनी आता ब्लड बॅंकेत आपले स्वतःचे पर्मनंट अकाऊंट काढले आहे. सध्या माणसांचे जग तर बदलले आहेच. शिवाय पशुपक्ष्यांच्या जगातसुद्धा केवढी अफाट प्रगती झाली आहे!
'अगूलाल आणि बगूलाल' हे दोघे मित्र आहेत. ते दोघे एकदा बंदूक घेऊन जंगलात शिकारीला गेले. बिबट्याची शिकार करून, त्याच्या सोबत फोटो काढून पेपरात छापायचा, असे त्यांनी ठरविले आहे. पण वाघाची डरकाळी ऐकताच दोघांचीही बोबडी वळली आणि हातातली बंदूक गळून पडली.
दोघांच्याही फजितीचे वर्णन करताना शेवटी कवयित्रीने लिहिले आहे :
'बिबट्याला पाहून सुटला घाम
अगूलाल बगूलाल पळाले लांब'.
मंदाताईंची कविता जंगलातील पशुपक्ष्यांची अरण्यबोली बोलते.
मंदाताईंनी एका कवितेत बालकवींना अपेक्षित असलेल्या निसर्गवेड्या 'दत्तटेकडी'चे अतिशय साजिवंत चित्र रेखाटले आहे. कवयित्रीने शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीसाठी आपल्या मनमंदिरात एक पणती लावण्याचे आवाहन बाळगोपाळांना केले आहे.
'अंगणात उतरले
कोवळेसे ऊन
पाखरांचा थवा आला
दाणे टिपतो वेचून'
अशी सुंदर शब्दचित्रे ही कविता रेखाटते. ह्या कवितेतील ध्वनिचित्रे कानांना गोड वाटतात. ह्या कवितेतील लय, ताल आणि ठेका आपल्याला ही कविता गुणगुणायला भाग पाडतो. ह्या कवितेतील नादानुकारी शब्द वाचकांच्या ओठांचा ताबा घेतात. मग ही कविता डॉ. मंदा खांडगे यांची उरत नाही. ही कविता तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची होऊन जाते. हेच ह्या कवितेचे यश आहे. ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेली प्रस्तावना ह्या कवितेची छान ओळख करून देते. प्रतीक काटे यांनी केलेली सजावट कवितेच्या सौंदर्यात भर घालणारी आहे. उत्तम निर्मितीसाठी प्रकाशकांचे अभिनंदन केलेच पाहिजे. नवीन पिढीतील बालवाचकांना ही 'वेडगाणी', म्हणजे गोडगाणी नक्कीच आवडतील, असा विश्वास वाटतो.
'वेडगाणी' (बालगीतसंग्रह)
कवयित्री : डॉ. मंदा खांडगे
प्रकाशक : सुनिताराजे पवार, संस्कृती प्रकाशन, पुणे.
मुखपृष्ठ : बजरंग लिंभोरे
रंगीत पृष्ठे ३२ किंमत रु. १००
पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS