नांदेड, दि. २८ मे — मासिक पाळी स्वच्छता दीनानिमित्त शुभंकरोती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने महिला आरोग्य, मासिक पाळी स्वच्छता आणि सन्मानपूर्वक आरोग्य व्यवस्थापन या विषयांवर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रभावी कार्य सुरू आहे. महिलांच्या आरोग्याशी निगडित अत्यंत महत्त्वाच्या या विषयाकडे समाजाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संस्था विविध स्तरांवर जनजागृती, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष मदत यांद्वारे विविध उपक्रम राबवत आहे.
मासिक पाळी हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील नैसर्गिक जैविक भाग असला तरी त्याबाबत समाजात आजही अनेक गैरसमज, संकोच आणि अपुरी माहिती आढळते. विशेषतः ग्रामीण भागातील महिला, किशोरवयीन मुली तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना योग्य माहिती व स्वच्छतेची साधने वेळेवर उपलब्ध होत नाहीत. ही गरज ओळखून शुभंकरोती फाऊंडेशन ने १४ वर्षांपूर्वी मासिक पाळी स्वच्छतेला केवळ आरोग्याचा नव्हे तर सन्मान, आत्मविश्वास आणि सामाजिक समानतेचा विषय मानत व्यापक जनजागृती मोहीम उभारली आहे. आजवर शुभंकरोती फाऊंडेशन च्या माध्यमातून १,४७,५२८ महिला व मुलींना मासिक पाळीतील स्वच्छता यायबत कार्यशाळा घेऊन जनजागृत करण्यात आले आहे.
महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर करणे आणि स्वच्छतेच्या योग्य सवयी समाजात रुजविणे या उद्देशाने संस्थेमार्फत शाळा, महाविद्यालये, ग्रामीण भाग, झोपडपट्टी परिसर, महिलांच्या बचत गटांमध्ये तसेच वंचित वस्त्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या माध्यमातून किशोरी व महिलांना मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेचे महत्त्व, आरोग्याची काळजी आणि सुरक्षित सॅनिटरी साधनांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले जाते.
यासोबतच शुभंकरोती फाऊंडेशन ने आजवर १,२९,२१४ गरजू महिलांना आणि किशोर वयीन मुलींना मोठ्या प्रमाणावर मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप केले आहे. या उपक्रमातून महिलांना थेट लाभ मिळाला असून अनेक मुलींना शाळा आणि शिक्षण नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी मदत झाली आहे. मासिक पाळीमुळे शिक्षण किंवा दैनंदिन जीवनात कोणताही अडथळा येऊ नये, या उद्देशाने संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. संस्थेमार्फत गरजू महिलांना आणि किशोरींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले असून आतापर्यंत हजारो महिलांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे. तसेच मासिक पाळी हा लाजेचा किंवा भीतीचा विषय नसून आरोग्य आणि सन्मानाशी जोडलेला नैसर्गिक विषय आहे, हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष संवाद सत्रे आणि जनजागृती मोहिमा राबविण्यात येतात.
महिलांना अल्प दरात उच्च दर्जाचे सॅनेटरी पॅड उपलब्ध व्हावे यासाठी शुभंकरोती फाऊंडेशन ने २०१९ साली देसाई फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र 'आसानी सॅनेटरी पॅड" निर्मिती प्रकल्पाची सुरुवात केली. स्टेफ्री, whispar यासारख्या भारताबाहेरील कंपन्यांच्या सॅनेटरी पॅड ला नाकारून आणि मागील ६ वर्षात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यात हजारो महिला व मुलींनी हे उच्च दर्जाचे सॅनेटरी पॅड अल्प दरात वापरण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकल्प फक्त महिलांच्या आरोग्यालाच प्रोत्साहन देत नसून या संकल्पनेला देखील हातभार लावत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे.
“National Family Health Survey च्या अहवालानुसार भारतात १५ ते २४ वयोगटातील सुमारे ७८ टक्के तरुणी मासिक पाळीदरम्यान स्वच्छ साधनांचा वापर करतात; तर महाराष्ट्रात हे प्रमाण सुमारे ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मागील १४ वर्षात शुभंकरोती फाऊंडेशन सारख्या संस्थेच्या भरीव योगदानामुळे महाराष्ट्रात या क्षेत्रात लक्षणीय सुधारणा झाली असली तरी ग्रामीण व वंचित भागात जागरूकता, उपलब्धता आणि परवड याबाबत अजूनही मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर शुभंकरोती फाऊंडेशन संस्थेचे जनजागृती आणि सॅनिटरी पॅड वितरणाचे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे.
शुभंकरोती फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी सांगितले की, “मासिक पाळी हा लपवण्याचा विषय नसून आरोग्य आणि सन्मानाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. याबाबत खुला संवाद निर्माण होणे आवश्यक आहे. प्रत्येक मुलगी आणि महिलेला स्वच्छता साधने, योग्य माहिती आणि आरोग्य सेवा उपलब्ध होणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. महिलांचे आरोग्य सुदृढ राहणे हे समाजाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
'२८ मे' मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त संस्थेने महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि स्वच्छतेसाठी आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली असून भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांद्वारे अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
COMMENTS