धर्म, जात, राजकीय पक्षाचे लेबल लागले की, "काक्रोज" ची लाट संपली म्हणून समजा !!
आपल्या देशात कधी कोणाचे महत्त्व वाढेल आणि कधी कोणाचे महत्त्व संपेल, हे सांगता येत नाही. त्यातल्या त्यात एखाद्याचे महत्त्व वाढले की, तो कोणत्या जातीचा आहे ? त्याचा धर्म कोणता ? कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे ? याचा शोध घेतला जातो.
"काक्रोज जनता पार्टी !"
या नावाच्या लाटेला खरंतर भारताचे सरन्यायाधीश श्री. सूर्य कांत हे जबाबदार धरले जात आहेत. कारण या सरन्यायाधीशांनी आपल्या डायसवर आणि न्यायपिठावर बसून पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सोशल मीडियाची खिल्ली उडवली आहे. त्यातल्या त्यात देशभरातील बेरोजगारांना झुरळाची उपमा दिली आहे.
सरन्यायाधीशांचा त्रागा काही अंशी खरा असला तरी बेरोजगारांना टार्गेट करताना, बेरोजगारांच्या समस्येवर तोडगा काढणारी उपाययोजना सरन्यायाधीशांनी केंद्र सरकारला सुचवायला हवी होती. बेरोजगारांबाबत तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात सरन्यायाधीशांनी केंद्र सरकारला स्पष्ट भाषेत सुनवायला हवे होते. मात्र, सत्ताधारी सरकारच्या "सरन्यायाधीश" पदाचे लाभार्थी असलेले श्री.सूर्य कांत असे काहीही करू शकलेले नाहीत. त्यामुळे देशभरातील लाखो, करोडो बेरोजगार जे की मोबाईलमध्ये आठ आठ, दहा दहा तास घालवतात. ज्यांच्या हाताला कामधंदा नाही. जे की मायबापाच्याही उपयोगी पडू शकत नाहीत. हातात गंडा, आखूड रेडीमेड कपडे, गुडघ्यापर्यंत येणारी पॅन्ट, वाढलेले डोक्यावरील केस, तोंडात तंबाखू किंवा गुटख्याची पुढी, खुरटलेली दाढी घेऊन शहरात असो की ग्रामपंचायत किंवा गावातल्या ओट्यावर बसणाऱ्यांनी काक्रोजला रात्रीतून "आभासी" हिरो केले आहे.
मात्र हे सर्व "आभासी" जग आहे. याच बेरोजगारांच्या "आभासी" जगाने नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या पक्षाला तीन वेळा केंद्रात आणि अनेक राज्यात सत्ता दिली आहे. या सत्तेने बेरोजगारांना दरवर्षी रोजगार देण्यासाठी जो वादा केला होता. तो वादा धुळीस मिळाला आहे. फेल गेला आहे. म्हणून "काक्रोज" सारख्या लाटेच्या माध्यमातून बेरोजगारांनी आक्रोश व्यक्त केला आहे. संताप व्यक्त केला आहे. बेरोजगारांच्या या संतापाला कुठल्या जातीची, धर्माची, पंथाची किंवा कुठल्या राजकीय पक्षाच्या झेंड्याची किनार नाही. हा करोडो बेरोजगारांच्या भुकेचा आवाज आहे. यात चीड आहे. सत्ताधाऱ्यांविरुद्धचा आवाज आणि संताप आहे.
"काक्रोज"ला मिळालेला आवाज हा आमचाच आहे. "काक्रोज" हा आमचाच आहे. "काक्रोज" आमच्या राजकीय पक्षाचा, जातीचा, धर्माचा आणि पंथाचा आहे. असे काही तथाकथित "ठेकेदार" आता पुढे येऊन सांगतील. बोलतील. सत्तेसाठी हापापलेले अनेक "सत्तापीपासू" लोक काक्रोजला सोबत घेण्यासाठी धडपड करतील. आम्हीच तुझे तारणहार आहोत. आम्ही तुला संरक्षण देऊ, असे म्हणत सोबत घेण्याचा प्रयत्न करतील. खरे तर इथे मात्र काक्रोजची खूप मोठी कसोटी आहे. काक्रोजची ही लाट स्वतःच्या विचारावर ठाम राहिली तर टिकेल. या लाटेने कुठल्या एकाच जातीचा, धर्माचा, पंथाचा रंग अंगाला लावून घेतला. कुठल्या राजकीय पक्षाचा झेंडा हातात घेतला तर मात्र काक्रोजची हवा रात्रीतून संपून जाईल.
देशभरातील फक्त बेरोजगारच नाही तर शेतकरी, कामगार, असे अनेक वर्ग महागाईमुळे मेटाकुटीला आले आहेत. "गोदी मीडिया" शिवाय देशात प्रसारमाध्यमे शिल्लक आहेत की नाहीत, याबाबत शंका येत आहे ? प्रत्येक जिल्ह्याजिल्ह्यातील, तालुक्यातालुक्यातील "गोदी मीडिया" एखाद्याला ठरवून जीवनातून संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. रोजच्या जगण्यासाठी सर्वसामान्यांची होरपळ होत आहे. अशाच अवस्थेत सरन्यायाधीश श्री. सूर्य कांत यांनी पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सोशल मीडियाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
असाहाय जगणाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यानंतर सरन्यायाधीशांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते आपल्या खुलाशात म्हणतात, "मी बोगस डिग्री घेणाऱ्यांच्या बाबतीत बोललो !" भारताच्या सरन्यायाधीशांना आमचा सवाल आहे ? "की गेल्या दहा वर्षांत ज्या ज्या महाविद्यालयांनी आणि विद्यापीठांनी पदव्या दिल्या. त्यामध्ये किती लोकांना संशोधनामध्ये पेटंट मिळाले ? पीएच.डी. करताना खरोखरच संशोधकांनी संशोधन केले का ? हे संशोधन मानवी जीवनासाठी खरोखरच किती प्रमाणात उपकारक ठरले ? तुम्ही संशोधकांच्या हातात पदव्यांच्या "धांडोळ्या" देताना तुमचे, म्हणजेच न्यायव्यवस्थेचे आणि सरकारचे नियंत्रण नव्हते का ?
एका बाजूला देशात बेरोजगारांचा कारखाना सुरू करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच बेरोजगारांकडे वाईट हेतूने आणि वाईट नजरेने पाहायचे ? हे कुठल्या सरकारच्या आणि न्यायव्यवस्थेच्या तत्त्वात बसते ? काक्रोजच्या लाटेमुळे अनेक राजकीय पक्ष हैराण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काक्रोज लाटेचा निर्माता अभिजीतला धमक्या येत आहेत म्हणे ! एका आभासी लाटेने केंद्रातील सत्ताधारी सरकार आणि अनेक राजकीय पक्ष गोंधळून गेले आहेत. "काक्रोज जनता पार्टी" हा नोंदणीकृत राजकीय पक्षही नाही. ही लाट कोणाचे "पिल्लू" आहे की आणखी एखादी "बी टीम", हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. एक मात्र खरे की, या लाटेमुळे देशभरातील बेरोजगारांच्या मनातील संताप समोर आला आहे.
हा संताप कोणा एकाचा नाही. बेरोजगारांबरोबरच देशभरातील समस्त निम्म्यापेक्षा अधिक लोकांचा हा आवाज आहे. या आवाजाने कुठला धर्म, जात, पंथ किंवा कुठला राजकीय पक्ष नजरेसमोर पाहिलेला नाही. हा आवाज दाबण्याचा अनेक जण प्रयत्न करतील. कोणी या आवाजाला सोबत घेण्यासाठी धमकावतील. स्वतः ठाम राहून या लाटेने जर स्वतःचा मेंदू वापरला तर देशात परिवर्तन घडू शकते.
परंतु ही लाट म्हणजे एक "आभासी" जग आहे. या "आभासी" जगात १६ ते ३० वयोगटातील लोकांचा खूप मोठा भरणा आहे. याच वयोगटाने अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या राजकीय पक्षांना पायउतार केले आहे. याच वयोगटाने देशाच्या कानाकोपऱ्यात "मोहदी... मोहदी..." म्हणून घोषणा दिल्या आहेत. या वयोगटाने ज्यांना सत्तेवर बसविले, त्यांच्याच कारकीर्दीत या वयोगटाला बेरोजगार म्हणून "उपाधी" मिळाली आहे. ...आणि सरन्यायाधीशांच्या मते हे बेरोजगार "झुरळ" म्हणजेच "काक्रोज" आहेत. देशभरातील पन्नास टक्के पेक्षा अधिक वर्गाला झुरळ म्हणून हिणवण्याची हिंमत येते तरी कोठून ?
महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री.भगतसिंग कोशारी यांच्या विषारी वक्तव्याप्रमाणेच भारताचे सरन्यायाधीश श्री. सूर्य कांत यांचा बोलवता धनी कोणी आहे का ? हे पाहावे लागेल? वैधानिक पदावर राहून, गोपनीयतेची शपथ घेऊन जर कोणी भारतीय राज्यघटनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर हा देश ही बाब खपवून घेणार नाही. बाकी "काक्रोज" ची लाट आपल्या भूमिकेवर ठाम राहिली तर टिकेल. अन्यथा, या लाटने जर एखाद्या राजकीय पक्ष, धर्म, जात,पंत आणि कुठल्या रंगाचा झेंडा हातात घेतला, तर मात्र ही लाट संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. कारण ही लाट सध्या तरी नि:धर्मी, निजातीयवादी आणि राजकीय विरहित आहे. ही लाट आभासी आहे. कुठल्या नेत्याच्या नेतृत्वाने ही लाट आलेली नाही. ही लाट आता जिरते की टिकून राहते, ते पहावयाचे आहे. कारण "आभासी" जग हे नेहमी आभासीच असते.
_ प्रकाश भगनुरे पाटील

COMMENTS