महात्मा फुले यांचे क्रांतिकारकत्व -डॉ.अजय गव्हाणे,

   महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक क्रांतिकारकांमध्ये १९ व्या शतकात महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. इतर सुधारक...

   महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक क्रांतिकारकांमध्ये १९ व्या शतकात महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. इतर सुधारकांनी कुटुंब आणि विवाह या सामाजिक संस्थेच्या सुधारणांवर लक्ष केंद्रित केले होते. मात्र महात्मा फुले यांनी असंख्य लोकांना गेल्या कित्येक शतकांपासून गुलाम बनविणाऱ्या जातीव्यवस्थेविरुद्ध विद्रोह केला. अडाणी व मागासलेला म्हणून उपेक्षित असलेला बहुजन समाज जागृत करण्याचे व संघटित करण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले आणि यामध्येच त्यांच्या कार्याचे क्रांतीप्रवण स्वरूप समाविष्ट आहे. महात्मा फुले यांनी सामाजिक चळवळीला तात्विक स्वरूप देण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

                महात्मा फुले यांनी पुण्यात १८५१ मध्ये दोन व १८५२ मध्ये एक अशा तीन मुलींच्या शाळा काढल्या. एतद्देशीयांनी पुण्यात सुरू केलेल्या या पहिल्या मुलींच्या शाळा होत. क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले, डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी, पंडिता रमाबाई, बिपिन बिहारीदास मेधावी, डॉ.रखमाबाई, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे, काशीताई कानिटकर, आनंदीबाई उर्फ बाया कर्वे, डॉ. कृष्णाबाई केळवकर, राधाबाई कृष्णराव केळवकर या कर्तृत्ववान सुशिक्षित स्त्रियांमुळे महाराष्ट्रात इंग्रजी राजवटीतल्या नव्या स्त्रीचे रूप परिचयाचे झाले. मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी निर्धाराने केलेल्या प्रयत्नांना आलेली ही फळे होती. सावित्रीबाई फुले यांनी कोणतेही वेतन न स्वीकारता ज्ञानदानाचे महान कार्य केले. त्या काळात बालविवाह प्रचलित असल्यामुळे मुलींची लग्न झाल्यानंतर सासरकडील मंडळी त्यांना शाळा सोडावयास लावत.

               मूलभूत मानवी हक्काच्या आधारावर निर्माण झालेल्या नव्या भारतीय समाज रचनेच्या स्थापनेस आवश्यक असलेली, मानवी समतेचा पुरस्कार करणारी आणि जातीभेद व धर्मभेद यांना धिक्कारणारी विचारसरणी महात्मा फुले यांनी सांगितली होती. त्यांनी समाजव्यवस्थेत रुजविण्यासाठी अपार कष्ट घेतलेल्या कित्येक सुधारणा आज समाजाने आणि शासनाने स्वीकारलेल्या आहेत. जातीभेदाबाबत त्यांची भूमिका सडेतोड होती. त्यांच्या मते जातीभेदाचे निर्मूलन झाल्याशिवाय राष्ट्रसभेने पुढे ठेवलेले एकराष्ट्रीयत्वाचे ध्येय प्रत्यक्षात उतरणे अशक्य आहे. 

               शिक्षण हे वरिष्ठ वर्गातून झिरपत झिरपत कनिष्ठ वर्गापर्यंत पोहोचेल; शिक्षणाच्या या झिरपत्या सिद्धांताला त्यांचा विरोध होता. हंटर कमिशनला स्पष्ट दिलेल्या निवेदनात दि. १९ ऑक्टोबर १८८२ रोजी त्यांनी शिक्षणविषयक स्पष्ट मते मांडलेली आहेत. भारतीय समाजक्रांतीचे जनक आणि भारतातील सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित असा त्यांचा सार्थ उल्लेख करता येईल.

               राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्या भूमिकेचे रहस्य जाणले होते. या भूमिकेमुळे त्यांची वृत्ती जातीभेदामुळे निर्माण होणारी सर्वच विषमता नष्ट करण्यास अनुकूल होती. 

                भारतात सामाजिक क्रांती करण्यात ज्यांचा समावेश आहे; त्यात महात्मा फुले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महात्मा फुले यांनी जातीनिर्मूलनासाठी केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या जातीनिर्मूलनाच्या कार्यातही लोकशाहीची तत्त्वे अंतर्भूत आहेत. जातीव्यवस्था आणि लोकशाही या परस्परांना छेदून जाणाऱ्या समाजव्यवस्था आहेत. लोकशाही मानवाच्या सर्वांगीण समतेवर उभारली आहे; तर जातीव्यवस्था माणसांमधील जन्माधिष्टित विषमतेवर आधारली आहे. त्यामुळे या दोन संस्था एकत्र राहू शकत नाही. लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर जातीव्यवस्थेचे निर्मूलन झाले पाहिजे. या दृष्टीने महात्मा फुले यांनी जातीव्यवस्थेविरुद्ध बंड करून लोकशाहीच्या विकासाची एक वाट मोकळी करून दिली.

               महात्मा फुले यांनी महाराष्ट्रातील लोकशाहीच्या दृष्टीने पुढील महत्त्वाचे विचार मांडले आणि सामाजिक क्रांती केली. १) जातीव्यवस्था, अस्पृश्यता, स्त्री-पुरुष भेदाभेद या विषमतेविरुद्ध वैचारिक आंदोलन केले आणि सामाजिक समतेचा पुरस्कार केला.  २) शिक्षणाच्या झिरपत्या सिद्धांतातील वैय्यर्थ दर्शवून शिक्षण प्रसारबाबत वेगळा विचार मांडला. लोकशाही वृद्धीच्या दृष्टीने या विचारास अनन्यसाधारण महत्त्व आहे.

                          -डॉ.अजय गव्हाणे,

                       राज्यशास्त्र विभागप्रमुख,

                   यशवंत महाविद्यालय, नांदेड.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group