किनवट तालुक्यातील बोधडी बु. येथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आज रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले ह...
किनवट तालुक्यातील बोधडी बु. येथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आज रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले होते. किनवट नांदेड महामार्ग दिड तास ठप्प करण्यात आला होता. रस्त्यावर ठिकठिकाणी टायर जाळून अडथळा निर्माण करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष असल्याचे यावेळी दिसून आले. वेळोवेळी निवेदने देऊन ही शासन दखल घेत नसल्याने जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांच्या नेतृत्वात खालील मागण्यांसाठी मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरला होता.
मका पिकाची हमीभावाने गावपातळीवर खरेदी सुरु करण्यात यावी. खरेदीचे अधिकार महिला बचतगटांना देण्यात यावे. बोधडी बु., इस्लापूर एम एस ई बी सब स्टेशन चे दहा मेगावॅट अपग्रेडेशन करण्यात यावे. एम एस ई बी सब स्टेशन बोधडी बु., इस्लापूर, टिंगणवाडी या ठिकाणी शेतीसाठी सिंगल फेस लाईट ची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी. मागील वीस वर्षाखाली वसलेल्या, ग्रामपंचायत बोधडी बु. व महसुली दृष्ट्या बोधडी खु. या गावात नोंद असलेल्या गोकुळवाडी या आदिवासी वस्तीला गावठाण व एजी वीज पुरवठा, रस्ता, पाणी, आदिवासी वनपट्टयांचे प्रश्न सोडवावेत. या आदिवासी वस्तीला तहसीलदारांनी भेट द्यावी. सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा. मागील तीन कर्ज माफीत न आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा.
कृषी विभागाचे उत्तम नखाते यांनी समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. विज वितरण कंपनीचे नामदेव केंद्रे यांनी लेखी आश्वासन देऊन शेतकऱ्याचा रोष कमी केला. पोलिस निरीक्षक गणेश कराड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद जाधव, बिट जमादार सिद्धार्थ वाघमारे, प्रदीप कुमार आत्राम, प्रकाश बोधमवाड यांच्या सह मोठा ताफा ठेवून शांतता सांभाळली, महसूल विभागाचे नायब तहसीलदार चंद्रशेखर सहारे यांनी यशस्वी शिष्टाई करीत येत्या गुरुवारच्या आत शासनाने हमीभावाने मका खरेदी महिला बचतगटांच्या माध्यमातून करावी या मागणीसाठी शेतकरी संघटना, नाफेड, आदिवासी महामंडळ, कृषी विभाग, गटविकास अधिकारी, उमेद व महिला बचत गट यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. शेतकरी आंदोलकांनी सामंजस्याची भुमिका घेत आंदोलन शांततेत पार पाडले.
या आंदोलनात नांदेड जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे उंचेगांवकर, त्रिभुवन सिंह ठाकुर, रामकिशन पाटील, रामराव जमादार, श्रीनिवास जमादार, गजानन चव्हाण, भारत राठोड, प्रभाकर बोड्डेवाड, अशोक शेलार, तुकाराम केंद्रे, रामेश्वर घुगे, नानु घुगे, ज्ञानेश्वर आनकाडे, ज्ञानेश्वर कांदे, धनलाल जाधव, अशोक राठोड, दादाराव डोंगरे यांच्या सह शेकडोंच्या संख्येने महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS