रस्ते दुरुस्तीकडे पाठ, टोल वसुली मात्र जोरात; नांदेड जिल्ह्यातील महामार्गांची दुरवस्था आणि अपघातांचे सत्र सुरूच किनवट/नांदेड (प्रतिनिधी): ...
रस्ते दुरुस्तीकडे पाठ, टोल वसुली मात्र जोरात; नांदेड जिल्ह्यातील महामार्गांची दुरवस्था आणि अपघातांचे सत्र सुरूच
किनवट/नांदेड (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून, हे मार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत. विशेषतः नॅशनल हायवे क्रमांक ३६१ आणि १६१ (ए) वरील वाढत्या अपघातांकडे नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट डायरेक्टर महेश पाटील यांचे होत असलेले सातत्याने दुर्लक्ष नागरिकांच्या संतापाचे मुख्य कारण ठरत आहे.
प्रोजेक्ट डायरेक्टरवर रोख: अपघातांचे सत्र तरीही अधिकारी सुस्त?
वारंगा जवळील जामगव्हान पाटी येथील कालव्यावरील वळण आता अपघातांचे केंद्र बनले आहे. शनिवारी सकाळी याच ठिकाणी MP 07 ZO 3117 क्रमांकाचा मालवाहू ट्रक उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. धक्कादायक बाब म्हणजे, याच दिवशी १२ वीच्या विद्यार्थ्यांचा गणिताचा पेपर असताना, मदतीसाठी १०३३ क्रमांकावर वारंवार कॉल करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर विद्यार्थ्यांना पायी चालत जाऊन दुसरे वाहन पकडावे लागले. इतक्या गंभीर घटना घडूनही प्रोजेक्ट डायरेक्टर महेश पाटील यांनी या वळणावर सुधारणा करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
काम कासवगतीने, टोल मात्र जोरात!
अधुरी कामे: नॅशनल हायवे ३६१ चे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अर्धापूर, वसमत फाटा आणि हदगाव जवळील पुलांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत.
दिशानिर्देशकांचा अभाव: मानवाडी फाटा येथे गतिरोधक किंवा दिशादर्शक फलक नसल्याने हा भाग 'मौत का जाल' बनला आहे.
टोल वसुली: रस्त्याचे काम अपूर्ण असताना आणि देखभालीचा अभाव असतानाही टोलची वसुली मात्र सक्तीने केली जात आहे, ज्यामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड रोष आहे.
महामार्ग १६१ (ए) वर ८ वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य
किनवट ते नांदेड या १५० किमीच्या प्रवासात प्रवाशांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. धानोरा घाट ते सावरी दरम्यान रस्ता पूर्णपणे उखडला असून गोकुंदा परिसरात तर रस्त्याचे अस्तित्वच उरले नाही.
आरोग्याचा प्रश्न: उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार आणि सततच्या झटक्यांमुळे पाठीच्या विकारांत वाढ झाली आहे.
प्रशासकीय निष्काळजीपणा: एनएचएआय (NHAI) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गेली ८ वर्षे ही स्थिती कायम आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या किनवट दौऱ्यादरम्यान भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप केंद्रे, उपसरपंच सरू शेख आणि माजी जि.प. सदस्य प्रवीण मॅकलवार यांनी निवेदन देऊन तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे.
प्रोजेक्ट डायरेक्टर महेश पाटील यांनी या जीवघेण्या वळणांवर आणि खड्ड्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल," असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.


COMMENTS