दयाळधानोरा परिसर हादरला; दुसरा बळी, अंत्यसंस्कार उद्या किनवट (प्रतिनिधी) :- दयाळधानोरा येथील बहुचर्चित अस्वल हल्ला प्रकरणात गंभीर जखमी असलेल...
किनवट (प्रतिनिधी) :- दयाळधानोरा येथील बहुचर्चित अस्वल हल्ला प्रकरणात गंभीर जखमी असलेले शेतकरी चंद्रसिंग शेषेराव राठोड (वय ४७) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मृत पिलाच्या शोधात असलेल्या मादी अस्वलाने १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री शेतात पिकाला पाणी देत असताना त्यांच्यासह अन्य शेतकऱ्यांवर हल्ला केला होता.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चंद्रसिंग राठोड यांच्यासह चार शेतकऱ्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना १६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे दहा ते अकराच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेला प्रादेशिक वनविभागाचे आप्पारावपेठ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी दुजोरा दिला.
या हल्ल्यातील पहिला बळी दत्ता जाधव यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे चंद्रसिंग राठोड यांच्या मृत्यूने या प्रकरणातील बळींची संख्या दोनवर पोहोचली आहे. घटनेमुळे दयाळधानोरा गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मादी अस्वल पिल्लाच्या शोधात असताना शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या एकूण नऊ शेतकऱ्यांवर तिने हल्ला केला होता. त्यामध्ये चार जण किरकोळ जखमी तर चार जण गंभीर जखमी झाले होते. उर्वरित जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळत आहे.
मृत चंद्रसिंग यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर १७ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीतीचे सावट असून नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शेतीसाठी रात्रीच्या विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना अंधारात काम करावे लागत असल्याने अशा घटना घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

COMMENTS