महात्मा फुले यांचा राष्ट्रवाद समजून घेताना...! डॉ. आर. डी. शिंदे सोनखेड

               मो९४२१३७९१६७  वर्तमान हिंदुत्ववादी पर्युषण पर्वातील सांस्कृतिक राष्ट्रवादाने सामाजिक विशेषतः राजकीय क्षेत्रात जो काही धुडगूस ...

 

             मो९४२१३७९१६७

 वर्तमान हिंदुत्ववादी पर्युषण पर्वातील सांस्कृतिक राष्ट्रवादाने सामाजिक विशेषतः राजकीय क्षेत्रात जो काही धुडगूस घातला आहे, त्याने भारत या राष्ट्राची सरळ देशप्रेमी आणि देशद्रोही अशी विभागणीच करून टाकली आहे. विशेष गमतीची बाब अशी की, या विभागणीत जे सच्चे देशप्रेमी होते, आहेत, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून देत कालकोठडी भोगली, अनंत यातना सहन केल्या, स्वतंत्र्य राष्ट्र म्हणून भारताच्या उभारणीत ज्यांनी महत्वाचे योगदान दिले, ज्यांचे वैचारिक वारसदार आजही देशहिताप्रती अत्यंत निष्ठापूर्वक कटिबध्द आहेत,अशा लोकांचा देशद्रोही गटात समावेश करण्यात आला आहे आणि जे परंपरेने देशाचे खरे शत्रू आहेत, अत्यंत महत्प्रयासाने देशाने स्वीकारलेल्या राजकीय संस्कृतीशी ज्यांचे काही एक देणेघेणे नाही, जे आधुनिक सभ्य आणि सुसंस्कृत अशा लोकशाही जीवनात सुध्दा वर्णव्यवस्थेच्या चौकटीतून बाहेर पडयला तयार नाहीत अशा नतद्रष्ट लोकांचा देशप्रेमी गटात समावेश करण्यात आला आहे. विशेष हे की, सत्तेच्या मस्तवाल धुंदीत कोण देशप्रेमी आणि कोण देशद्रोही यावरही तेच मोहर उमटवीत आहेत. अर्थात अशा प्रकारची विभागणी देशाला काही नवीन नाही. धर्माच्या आणि जात-जमातवादाच्या नावाने समाजाचे ध्रुवीकरण करायचे आणि आपापली व्होटबँक सांभाळत राजशकट हाकलायचा हा उद्योग या देशात स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासूनच चालू होता. त्याची जबर किंमतही देशाला मोजावी लागली. तसा प्रसंग देशावर पुन्हा येऊ नये म्हणून राष्ट्रनिर्मात्यांनी भारताच्या विविधतेला अनुरूप बहुसांस्कृतिक राष्ट्रवादाचा स्वीकार केला. बहुसांस्कृतिक राष्ट्रवादात समान हक्क व अधिकारांसह बहुधर्मीय संस्कृतीचे सहअस्तित्व संज्ञापित आहे. अन्य परिभाषेत यालाच 'घटनात्मक राष्ट्रवाद' असेही म्हणतात. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा घटनात्मक राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे घटनात्मक राष्ट्रवादाशी सुसंगत कोणतीही वैचारिक मांडणी वा कृती म्हणजे देशप्रेम आणि विपरीत मांडणी वा कृती म्हणजे देशद्रोह अशी सुस्पष्ट व्याख्या त्यात अंतर्भूत आहे. त्यामुळेच भारतातील प्रत्येक नागरिकांचे सार्वजनिक वर्तन हे अत्यंत उदारवादी, सहिष्णू आणि द्वेषविरहित असणे घटनात्मक राष्ट्रवादाला अपेक्षित आहे. परंतु वर्तमानातील कट्टर हिंदुत्ववादी फॅनाटिक मानसिकतेने शूद्र राजकीय स्वार्थापायी जो 'हिंदुत्ववादी राष्ट्रवादा'चा घाट घातला आहे, त्याने घटनात्मक राष्ट्रवादाचा पाया अधिकच ठिसूळ केला आहे. 'हिंदुत्व म्हणजे उच्च नैतिक मूल्यावर आधारलेले जीवन पद्धती', अशी हिंदुत्ववाद्यांकडून केली जाणारी हिंदू राष्ट्रवादाची व्याख्या कितीही उदात्त असली तरी तिचा व्यावहारिक पातळीवरील आविष्कार अन्य धर्मवर्ज्यक राष्ट्रवाद असाच होतो, याची प्रचिती इतिहास काळापासून अनेकदा आली आहे. वर्तमानात धर्माने मुस्लिम असलेल्या अखलाखला गोमांस खाल्ले या क्षुल्लक कारणावरून हिंसक बनलेल्या झंडशाहीत जीव गमवावा लागला तर दलित-आदिवासी असलेल्या रोहित वेमूला व पायल तडवी येथील जातिव्यवस्थेने इतके अपमानित केले की, त्यांना आत्महत्या करणे भाग पडले. यासर्व घटनाप्रसंगातून हिंदुत्ववादी राष्ट्रवाद हा अन्य धर्मवर्ज्यक राष्ट्रवाद असल्याचे जणू शिक्कामोर्तबच होते. अशा पृथगतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचा राष्ट्रवाद पुन्हा एकदा नव्याने समजून घेण्याची वेळ आली आहे.

 महात्मा जोतीराव फुले हे काही राजकीय विचारवंत नव्हते. त्यांच्या सत्यशोधक समाजात राजकीय विषयावर बोलणेही अजीवर्ज्य होते. त्यांनी राष्ट्रवादी नेते जोसेफ मॅझिनी, गॅरिबाल्डी,अरविंद घोष, वि. दा. सावरकर, लोकमान्य टिळक यांच्या सारखा एखादा नवोन्मेषी राष्ट्रवादी सिद्धांतही मांडला नाही. तरीही त्यांच्या विचारव्यूहात राष्ट्रवादी विचारांचे दर्शन घडते. तत्कालीन प्रस्थापित समाजव्यवस्थेबद्दलचे अत्यंतिक असमाधान, त्यातून जन्माला आलेली बंडखोर कृती, नवीन अनुभवांमधून होत असलेली जुन्या विचारांची तपासणी व त्यावर आधारलेली नवीन कृती अशा द्वंद्वात्मक प्रक्रियेतून महात्मा जोतीराव फुले यांचा राष्ट्रवादी जीवनपट आकाराला आला आहे. भारतासारख्या बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतिक देशात बहुसंख्येने असलेल्या हिंदू वंशाच्या, धर्माच्या व राष्ट्रकाच्या आधारे राष्ट्रवादाची मांडणी करणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने अजिबात हितावह नाही अशी जोतीरावांची पक्की धारणा बनली होती. कारण राष्ट्रवादाच्या संकल्पनेत केवळ 'भूमीची अखंडता' अनुस्यूत नाही तर विविध वंश, धर्म, भाषा, संप्रदाय, जाती व जमातींच्या लोकांमध्ये एकीची भावना आवश्यक असते. म्हणूनच महात्मा जोतीराव फुले यांनी 'एकमय लोक' अशी राष्ट्राची (Nation) व्याख्या केली आहे. 'मानवी ऐक्य हेच एक अंतिम सत्य' किंवा 'मानव तेवढा एक' हा जोतीरावांच्या विचारांचा मुख्य केंद्रबिंदू होता. याविषयी ते आपल्या सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथात म्हणतात," आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याच्या व्यवस्थेवरून एकंदर जे सर्व स्त्रीपुरुष दुसऱ्यांच्या धर्मासंबंधीं मतांवरून अथवा राजकीयसंबंधीं मतांवरून त्यास कोणत्याही प्रकारें नीच मानून त्यांचा छळ करीत नाहींत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत. जोतीरावांचे हे विचार एकजीव संस्कृतीचे द्योतक मानले जाते. त्यासाठी त्यांनी 'बहीण भावंडभाव' असा मराठी प्रतिशब्द वापरला आहे. राष्ट्रवाद ही राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय विकासाशी निगडित संकल्पना आहे. परंतु तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी यादृष्टीने फारसे प्रयत्न केले नसल्यामुळे आपला देश पारतंत्र्यात गेला असा जोतीरावांनी जो युक्तिवाद केला आहे. त्याला संदर्भांकीत इतिहासाचा आधार आहे. फुले काळात राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या सार्वजनिक सभा आणि इंडियन नॅशनल काँग्रेस या दोन प्रमुख सामाजिक आणि राजकीय संस्था होत्या. परंतु या दोन्ही संस्थांचा एकही सभासद शूद्र कुलीन नव्हता. म्हणूनच महात्मा फुले यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. यासंदर्भात ते म्हणतात, एकट्या आर्यभट्ट ब्राह्मणांनी नॅशनल काँग्रेस स्थापिली, तर तिला कोण विचारतो ? अर्थातच त्या सर्वांमध्ये (शूद्रादि - अतिशूद्र, भिल्ल, कोळी वगैरे) भिन्न भिन्न प्रकारचे आचार-विचार, खाणे-पिणे, रितीभाती एकमेकांच्या एकमेकांशी मिळत नाहींत. अशा अठरा धान्यांची एकी होऊन त्याचे चरचरीत कडबोळे म्हणजे एकमय लोक 'Nation' कसे होऊ शकेल ? असा प्रश्नही जोतीराव उपस्थित करतात. हिंदू हे एक समाज किंवा राष्ट्र नाही यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मार्मिक शब्दांत टिप्पणी केली आहे. ती टिप्पणी जोतीरावांच्या मताला दुजोरा देणारी अशीच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर  म्हणतात,"There is an uttar lack among the Hindus of what the sociologist call 'Consciousness of Kind'. There is no Hindu Consciousness of kind. In every Hindu the consciousness that exists is the consciousness of his caste. That is reason why the Hindus cannot be said to form a society or a nation." यावरून महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारात राष्ट्रवादाची जेवढी सुस्पष्ट व्याख्या दिसते तेवढी इतर कोणत्याही भारतीय राजकीय विचारवंतांच्या विचारात दिसत नाही. तरीही तथाकथित राष्ट्रवादी महात्मा जोतीराव फुले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन इंग्रज धार्जिणे, साम्राज्यशाहीचे हस्तक, राष्ट्रघातकी अशा तऱ्हेने करतात याचे आश्चर्य वाटते. त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळकांपासून ते आजकालच्या, बाळ गांगल आणि संभाजी भिडेंचा समावेश होतो. या संदर्भात ते जोतीराव फुले आणि काही ब्रिटिश राज्यकर्ते यांच्यातील 'मधुर' संबंध आणि जोतीरावांनी आपल्या साहित्यात ब्रिटिश साम्राज्यशाहीला पाठीशी घातल्याचे दाखले देतात.

      तात्पर्य ब्रिटिश शासन हे बहुजन समाजाची उन्नती करून घेण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे असे महात्मा जोतीराव फुले यांचे मत होते आणि हे मत परकीय सत्तेचे देशीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचे (म्हणजे पारतंत्र्याचे समर्थन करणारे) द्योतक होते, असा टीकाकारांचा मतितार्थ आहे, त्यामुळे फुले हे राष्ट्रवादी नव्हते असा त्यांचा तर्क आहे. अर्थात त्यांचा हा तर्क पूर्णतः वस्तुस्थितीला धरून नाही असेच म्हणावे लागेल. कारण भारतात सामाजिक सुधारणा करू इच्छिणाऱ्या अनेक सुधारकांचे आधी सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय सुधारणेला अर्थ नाही असेच मत होते. महात्मा फुले यांच्या टीकाकरांतील प्रमुख शिलेदार विष्णुशास्त्री चिपळूणकर हे तर अव्वल दर्जाचे इंग्रजी राज्याचे प्रशंसक होते. आपल्या निबंध मालेत इंग्रजी राज्याविषयी मत नोंदविताना ते म्हणतात, पूर्वी ज्या प्रकारची स्वस्थता या देशात बहुदा कधीही प्राप्त झाली नसेल; अशी इंग्रजी राज्य प्रस्थापित झाल्यापासून नांदत आहे. राजा राममोहन राॅय यांचा तर ब्रिटिशांना जाहीर पाठिंबाच होता. न्यायमूर्ती रानडे भारतातील ब्रिटिश राज्याला परमेश्वरी इच्छा मानत होते. आगरकर ब्रिटिश राज्याविषयी लिहितात, सामाजिक सुधारणा करण्यास आजमितीस आम्हास जेवढी अनुकूल वेळ आली आहे तितकी पूर्वी कधीही आलेली नव्हती. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनीही अनेक संपादकीय टिपणातून इंग्रजी राज्याचे भरभरून स्वागत केले आहे. असे असता एकटे महात्मा फुले देशद्रोही कसे ? सन १८२३ साली एल्फिन्स्टन आणि एलेनबरो या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कमिशनरला दिलेल्या पत्रात, भारतातील बहुजन समाज हा राष्ट्रभक्त तर उच्चवर्ग हा इंग्रजनिष्ठ आहे, असे नमूद केले आहे. त्यांच्या विधानातील तपशील नीट समजून घेतला तर या देशातील राष्ट्रवादी विचाराचा मुखवटाच बदलून जाईल. परंतु उच्चवर्णीय सारस्वतांनी राष्ट्रवादाचा खरा मुखवटा सर्वसामान्य जनतेसमोर कधी येऊच दिला नाही. इतिहासाची मांडणी करताना त्यांनी नेहमी स्वजातीची बाजू घेत परजातीची अवहेलना केली. हा त्यांचा दुटप्पीपणा म्हणायचा की महात्मा फुले सारख्या  असंख्य शूद्र समाजातील राष्ट्रीय नेतृत्वाकडे पाहण्याचा श्रेष्ठ वर्गीय शूद्र दृष्टीकोन समजायचा. 

   आपल्या इतिहासकारांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता असेल तर तो आपल्या देशाच्या संदर्भात राष्ट्रवादाची व्याख्या कशी करावयाची ?भारतासारखा जो देश ज्याच्या इतिहासात राष्ट्र (Nation) कधीच होऊ शकले नाही. ज्या देशात अनेक राष्ट्रके (Nationalities) अद्यापही आपण जोपासलेली आहेत. त्या देशातील कोणत्या नेत्याला राष्ट्रवादी मानायचे हा अतिशय जटील प्रश्न आहे. स्त्रिया व शूद्रांचे अधिकार नाकारणारे लोकमान्य टिळक, सुधारकांना धेड म्हणत त्यांचा निषेध करणारे चाफेकर आणि ने मजसी ने सागरा मातृभूमीसाठी प्राण तळमळला म्हणत ब्रिटिश सरकार पुढे माफीचा साक्षीदार होणारे विनायक दामोदर सावरकर जर राष्ट्रवादी ठरणार असतील तर स्त्रिया आणि बहुजन समाजाचे अधिकार मिळविण्यासाठी प्राणपणाने लढणारे जोतीराव फुले हे देखील आपणाला प्रखर राष्ट्रवादी मानावेच लागतील. महात्मा फुले हे  अव्वल दर्जाचे देशभक्त होते, यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही. आपल्या देशावर, देशातील सामान्य जनतेवर त्यांचे जिवापाड प्रेम होते. परंतु या देशातील सामान्य जनतेच्या गळ्यात येथील भटशाहीने वर्णजाती सिद्धांताच्या नावाखाली जो गुलामीचा पट्टा बांधला होता. तो तोडून फेकून दिल्याशिवाय त्यांना मोकळा श्वासही घेणे शक्य नाही, या जाणिवेतून त्यांनी ब्रिटिश राज्याची पाठराखण केली होती. याचा अर्थ हा देश पारतंत्र्यातच राहिला पाहिजे,असे त्यांचे मत मुळीच नव्हते. या संदर्भात ते आपल्या गुलामगिरी या ग्रंथात म्हणतात, इंग्रज लोक आज आहेत, उद्या नाहीत, ते आपल्या जन्मास पुरतील म्हणून कोणाच्यानें खास करून सांगवत नाही.यास्तव त्या लोकांचे राज्य या देशांत आहे, तोंच आपण सर्व शुद्रांनी जलदी करून भटांच्या वडिलोपार्जित दास्यत्वापासून मुक्त व्हावे, यामध्ये मोठा शहाणपणा आहे. महात्मा फुले यांच्यासमोर त्याकाळी एक ज्वलंत प्रश्न होता तो म्हणजे इंग्रज गेल्यास पुढे काय ? पुन्हा भटशाही ! भटशाहीचा पूर्वानुभव तर अत्यंत असह्य होता. दस्तुरखुद्द महात्मा फुले यांनाही भटशाहीचे भयानक चटके सोसावे लागले होते. त्यामुळे सर्वच अंगांनी प्रगत अशा ब्रिटिश राजवटीबद्दल निम्नवर्णीय वर्गाला सहानुभूती वाटणे स्वाभाविक होते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की, तत्कालीन परिस्थितीमध्ये भारतात केवळ हिंदू समाजातच नव्हे तर मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन अशा अन्य धार्मिक व सांस्कृतिक समूहात सुद्धा राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयत्वाच्या निर्मितीसाठी आवश्यक असा बंधुभाव निर्माण करणाऱ्या बाबी बऱ्याचशा विस्कळीत व दुबळ्या होत्या. सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठा इत्यादींचे अतिशय विषम वाटप झालेली समाजरचना कित्येक पिढ्यांपासून चालत आलेली होती. समाजातील वरिष्ठ जातींचा कनिष्ठ जातींवर असलेला चढत्या स्वरूपाचा प्रभाव, वर्चस्व आणि अहंकार कनिष्ठ जातींना माणुसकी नाकारण्याच्या बिंदूवर पोहोचला होता. अशा विघातक पार्श्वभूमीवर केवळ राजकीय स्वातंत्र्याचा उद्घोष करणे पुरेसा ठरत नाही तर त्यासाठी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्याचाही उद्घोष अनिवार्य ठरतो, अशी महात्मा फुले यांची धारणा होती. कारण राष्ट्रीयत्वामध्ये एका समान भागीदारीची (Sense of Sharing) भावना लोकांमध्ये आवश्यक असते. ती महात्मा फुले यांच्या विचारात दिसून येते. म्हणूनच त्यांचा राष्ट्रवाद हा प्रखर राष्ट्रवाद होता. तो अन्य नेत्यांप्रमाणे धार्मिक अभिन्वेषाच्या परिभाषेत बसणारा नव्हता, हे समजून न घेता त्यांना व त्यांच्या अनुयायांना देशद्रोही ठरविणे हाच मुळी देशद्रोह आहे. महात्मा फुले यांचा राष्ट्रवादी विचार हा अत्यंत उदारवादी, सुधारणावादी आणि राष्ट्राच्याही पुढे घेऊन जाणारा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आहे. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात मांडलेली सहधर्मीय सहअस्तित्वाची संकल्पना म्हणजे आंतरराष्ट्रीयवादाचे बीजरूप आहे. पुढे कित्येक दशकानंतर जागतिक संस्कृतीला सामावून घेणाऱ्या आंतरराष्ट्रीयवादाचा राज्यशास्त्रात तसेच भारतीय घटनेत स्वीकार करण्यात आला. परंतु तथाकथित हिंदुत्ववाद्यांना महात्मा फुले यांचा व्यापक राष्ट्रवाद मुळीच मान्य नाही. कारण त्यांना वर्णवर्चस्ववादाने ग्रासलेल्या धर्मरुढींचे जबरदस्त आकर्षण आहे. राष्ट्रनिर्मात्यांनी बदलून टाकलेल्या जुन्या जीवनपद्धतीचेच त्यांना पुनरुत्थान करावयाचे आहे. सामाजिक सुधारणेचे घड्याळ जे पुढे गेले आहे ते पुन्हा त्यांना पाठीमागे न्यावयाचे आहे. म्हणूनच ते सातत्याने महात्मा फुले यांना टीकेचे लक्ष्य बनवीत असतात. शेवटी नेल्सन मंडेला यांच्या शब्दांत, जगाच्या पाठीवरल्या कोणत्याही धर्मातला कोणताही माणूस जेव्हा आपण त्या धर्माचे कट्टर आहोत म्हणून सांगतो तेव्हा तो त्या धर्मातला प्रचंड बोगस माणूस असतो. आपला खरा धर्म सांगणारी माणसं आपण कट्टर धर्मवादी आहोत असं कधीच सांगत नाहीत. ती आपला धर्म निमूटपणे मानतात आणि दुसऱ्याला आपल्या धर्माचा आदर वाटावा अशा पद्धतीने तो अमलात आणतात. कोणत्याही धर्माच्या आधारे माणूस जितका जास्त धार्मिक होतो तितका तो जास्त ढोंगी असतो हा गुरुत्वाकर्षणाइतकाच साधा नियम आहे !

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group