नांदेड:(दि. १२ फेब्रुवारी २०२६)
महिलांमध्ये राजकीय नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांचा राजकारणातील सहभाग वाखाणण्यासारखा असून समाजकारणातून राजकारणाकडे हा त्यांचा प्रवास असतो. महिलांकडे नेतृत्व असताना पुरुषांचा हस्तक्षेप अवाजवी आहे. महिलांमधील साहस, धाडस, नेतृत्व, कर्तृत्व आजमावण्याची आज योग्य वेळ असल्याचे प्रतिपादन राज्यशास्त्रातील सुप्रसिद्ध लेखिका व वक्त्या डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार यांनी केले. यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित 'महिलांचा राजकारणातील सहभाग' या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.
अध्यक्षीय समारोपात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, महिला या केवळ सामाजिक, राजकीय व आर्थिकच नाही तर समाज जीवनाच्या सर्वांगीण क्षेत्राच्या आधारस्तंभ आहेत. स्त्री ही कुटुंबाची जडणघडण करत असतानाच समाज व देशासाठीही धडपडत असते. सध्या नांदेड शहराच्या प्रथम नागरिक महिला आहेत; ही अभिमानास्पद बाब आहे, असे म्हटले.
उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी आपल्या मनोगतात, विद्यार्थिनींनी मनाशी खुणगाठ बांधली पाहिजे की, स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय विवाह करणार नाही; अन्यथा जीवनात दुर्बलता येण्याची शक्यता असते. कुटुंब, समाज आणि राजकारणातील हक्क व सत्तेच्या वाट्यासाठी संघर्ष केल्याशिवाय काहीही प्राप्त होणार नाही. प्रारंभी प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. काजल बुक्तरे, प्रमुख अतिथींचा परिचय कु. विशाखा व्यवहारे आणि शेवटी आभार कु. साक्षी पाटील यांनी मानले. याप्रसंगी डॉ.वीरभद्र स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानास डॉ.मीरा फड, डॉ.शिवराज बोकडे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी प्रा.राजश्री भोपाळे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे, ज्ञानेश्वर डाके आदींनी सहकार्य केले.

COMMENTS