नरेंद्र येरावार
उमरी
सध्याचे युग हे संगणकीय युग आहे. मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने लहान मुले बिघडली आहेत. अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या लहान मुलांवर आध्यात्मिक संस्कार घडवण्याची गरज आहे. संत चरित्र कथेतून चांगले संस्कार करा, त्यांना आध्यात्मिक कथा सांगा, लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा, महापुरुष आणि साधू संताचे चित्र घरात लावा, चारित्र्य नीती शिकवा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कथाकार बालयोगी आचार्य स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांनी केले.उमरी शहरातील श्री संत दासगणू नगर शिक्षक कॉलनी भागात आयोजित श्रीमद देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यातून ते बोलत होते.
आचार्य गजेंद्र चैतन्यजी महाराज पुढे म्हणाले, काळ कठीण आहे घरातील म्हाताऱ्या व्यक्तींना वेळ दिला पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. स्वामी विवेकानंदाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे सांगताना गोरठा येथील स्वामी वरदानंद भारती यांच्या चरित्रावरही प्रकाश टाकला. गुरुतत्त्वाचे वर्णन करून आपला आदर्श इतरांनी घ्यावा असे वागावे, महाराष्ट्रात झालेल्या संत चरित्रांचा अभ्यास करावा, नाम चिंतन करावे, हृदयात भगवंताचे ध्यान करावे, साधना करावी त्यातूनच खरा मार्ग मिळतो. वेद व्यासांचे चरित्र वर्णन करून घरात चांगले संस्कार घडत नसल्याने तरुणपिढी बिघडली आहे. शास्त्राचे चिंतन करताना अंतकरणात चांगला भाव ठेवावा. बहुमौलिक साहित्याचे वाचन करा. आध्यात्मिक ग्रंथातून ऊर्जा मिळते असे सांगून 28 युगांचे चरित्र प्रसंग सांगितले. लहरी बाबा कृपांकित परमपूज्य आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या श्रीमद् देवी भागवत कथेला उमरीत मोठा प्रतिसाद मिळत आहे.
कथेला संगीत साथ गायक दीपक मालवे, पॅड वादक भास्कर मोहोळ, बँजो व ऑर्गन वादक अमोल कांबळे, तबला वादक प्रथमेश राणे, झाकी सजावट हेमराज काळे, सोशल मीडिया प्रमुख माधव पाटील विरसणीकर यांची संगीत साथ मिळत आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री दत्तप्रभू मूर्ती प्राणप्रतिष्ठापना गुरुवर्य महंत 1008 राम भारती महाराज यांच्या हस्ते करण्यात आली असून महंत संतोषपुरी महाराज चोळाखेकर यांचेही कीर्तन झाले. दरम्यान काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन, हरिपाठ, देवी भागवत कथा आणि हरी जागर आदी धार्मिक कार्यक्रम होत आहेत. मूर्ती प्राणप्रतिष्ठा पंडितजी वेदमूर्ती महेश महाराज जोशी बाळापूरकर यांच्या हस्ते हवन व पूजा विधी संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमाची सांगता 4 मार्च रोजी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल. सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री संत दासगणू नगर व शिक्षक कॉलनी भागातील समस्त गावकरी मंडळी परिश्रम घेत आहे.

COMMENTS