नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेली घरफोडीची घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना अवघ्या १२ तासांत यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १९ लाख ६१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात फिर्यादी महिलेनेच चोरीचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तिलाही आता आरोपी करण्यात आले आहे.
भाग्यनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा (गु.र.नं. ८९/२०२६) दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी चोरी व घरफोडीचे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक तपास करत असताना, आरोपी तुळजापूर येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
तुळजापुरातून आरोपींना ठोकल्या बेड्या
सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास करत पोलीस पथक तुळजापूरला पोहोचले. तेथील देवस्थानबाहेर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी संभाजीनगर, कॅनॉल रोड येथील घरात चोरी केल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. आनंद नामदेवराव जाधव (२७ वर्षे, रा. काबरानगर)
२. राजेश लक्ष्मण पांचाळ (२३ वर्षे, रा. सिडको)
३. पुजा दिपक नरवडे (२६ वर्षे, रा. काबरानगर)
४. स्मिता लक्ष्मण पौळ (२८ वर्षे, रा. संभाजीनगर)
५. संध्या किशनराव डोनगे (२९ वर्षे, रा. संभाजीनगर)
फिर्यादीचा खोटा बनाव उघड
तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपींनी दागिने चोरल्याची कबुली दिली, मात्र १२.५० लाख रुपयांची रोकड चोरली नसल्याचे सांगितले. पोलिसांनी फिर्यादी महिला मंगल पोशेट्टी जंगिलवाड हिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने ही रक्कम यापूर्वीच आपल्या आईच्या घरी (ब्राम्हणगाव, जि. यवतमाळ) लपवून ठेवल्याचे कबूल केले. चोरीचा खोटा बनाव केल्याप्रकरणी फिर्यादीवरही कलम २१७ BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेला मुद्देमाल:
• नगदी रोकड: १२,५०,०००/- रुपये
• सोने (०७ ग्राम): १,०५,०००/- रुपये
• चांदी (२० तोळे): ४०,०००/- रुपये
• बेंटेक्स दागिने: १८,०००/- रुपये
• वाहन: ५ लाख किमतीची कार आणि ६५ हजारांची स्कुटी
• एकूण जप्त किंमत: १९,६१,८००/- रुपये (१००% मुद्देमाल जप्त)
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष तांबे, महेश माळी, पोउपनि विनोद देशमुख आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.
आपल्या भागातील अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा 'Globalmarathwada.page'.

COMMENTS