नांदेड: 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेचा ऑनलाईन सर्व्हे करून रिपोर्ट सबमिट करण्याच्या मोबदल्यात २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. संतोष नागोराव बोयाळ (वय ३८, रा. नाईक नगर, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे वानेगाव (ता. जि. नांदेड) येथे शेती आहे. या शेतीसाठी त्यांनी ३० सप्टेंबर २०२५ रोजी 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज केला होता. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी महावितरणच्या लिंबगाव उपविभागाचे लाईनमन संतोष बोयाळ हे या अर्जाचा ऑनलाईन सर्व्हे करण्यासाठी शेतात आले होते.
सर्व्हेचा रिपोर्ट सबमिट करण्यासाठी बोयाळ यांनी तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांची मागणी केली. "इतर लाभार्थ्यांकडून मी ३ हजार रुपये घेतो, तुलाही द्यावे लागतील," असे त्यांनी बजावले होते. तक्रारदाराने पैसे देण्यास असमर्थता दर्शवूनही बोयाळ यांनी सातत्याने फोन करून पैशांचा तगादा लावला होता.
एसीबीचा सापळा आणि कारवाई
लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदाराने नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. आज, ११ फेब्रुवारी रोजी एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली. सुरुवातीला ३ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या बोयाळ यांनी तडजोडीअंती २ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानंतर, नवीन मोंढ्या जवळील माधव दाल मिल परिसरात सापळा रचण्यात आला. आयटीआय ते अण्णाभाऊ साठे चौक रोडवरील गजानन पान शॉपसमोर तक्रारदाराकडून २ हजार रुपये स्वीकारताना संतोष बोयाळ यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.
पुढील कारवाई सुरू
आरोपी संतोष बोयाळ हा महावितरणच्या लिंबगाव शाखेत वरिष्ठ तंत्रज्ञ (गट-क) पदावर कार्यरत आहे. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आले असून, घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.
ही कारवाई कुणी केली?
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडच्या पोलीस निरीक्षक श्रीमती माधुरी यावलीकर, पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रसूल तांबोळी व त्यांच्या पथकाने केली आहे.
आपल्या भागातील अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा: Globalmarathwada.page

COMMENTS