धुळे: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), लातूरच्या वतीने आयोजित शब्दकोडे स्पर्धेच्या विभागीय फेरीत धुळे येथे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. वेळेची चुकीची नोंद आणि वयोमानाचे अजब निकष लावल्याने राज्यभरातून आलेल्या स्पर्धक शिक्षकांनी आयोजकांविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याप्रकरणी शिक्षण संचालकांकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतला आहे.
नेमका प्रकार काय?
शुक्रवार, ३० जानेवारी रोजी धुळे येथील डायट कॉलेजमध्ये राज्यस्तरीय शब्दकोडे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १ वाजता स्पर्धकांना शब्दकोडे सोडवण्यासाठी पेपर देण्यात आले. स्पर्धक दीपा गिरी यांनी अवघ्या ७ मिनिटांत (१ वाजून ७ मिनिटांनी) आपला पेपर पर्यवेक्षकांकडे सुपूर्द केला. मात्र, पर्यवेक्षकांनी पेपर स्वीकारताना त्यावर ९ मिनिटांची नोंद केली. याबाबत विचारणा केली असता, "तुमचा पेपर हातात घेईपर्यंत दोन मिनिटे लागली, म्हणून ९ मिनिटे वेळ नोंदवला," असे अजब उत्तर पर्यवेक्षकांनी दिले. दोन मिनिटे वाढवून लिहिल्यामुळे अनेक पात्र स्पर्धकांना स्पर्धेतून बाद व्हावे लागले.
प्राचार्यांची उडवाउडवीची उत्तरे
या गोंधळाबाबत डायट कॉलेजच्या प्राचार्या जयश्री पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पारदर्शकतेऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली. "आम्ही वयोमानाचा निकष लावून गुणानुक्रम काढला आहे, मला तुमच्याशी बोलायला वेळ नाही," असे म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. आयोजकांच्या या आडमुठ्या धोरणामुळे आणि नियमबाह्य निवड प्रक्रियेमुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे.
शिक्षण संचालकांकडे धाव घेणार
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिक्षक स्पर्धकांनी या संपूर्ण प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. वेळेत फेरफार करणे आणि ऐनवेळी वयोमानाचे निकष लावणे हे अन्यायकारक असल्याचे सांगत, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. या अन्यायाविरोधात लवकरच शिक्षण संचालकांकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे स्पर्धकांनी सांगितले.

COMMENTS