*
नांदेड:( दि.२६ जुलै २०२५)
प्रत्येक क्षेत्रात आज जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला या स्पर्धेत हिरीरीने उतरावे लागेल. भाजी विकणाऱ्याचा मुलगा यूपीएससी पास होऊ शकतो; परंतु त्यासाठी विद्यार्थी वयात प्रत्येक विद्यार्थ्याला कष्ट हे आपल्या जीवनाचे मर्म समजून करावे लागेल; परंतु अलीकडील काळात वाचन, लेखन, मनन आणि चिंतन यापासून विद्यार्थी दूर जातो आहे असे प्रतिपादन डॉ.शंकर लेखने यांनी केले आहे यशवंत महाविद्यालयाच्या लोकप्रशासन विभागामार्फत माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित सत्रआरंभ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.शंकर लेखने बोलत होते. श्री.मधुकरराव पाटील खतगावकर महाविद्यालय, शंकरनगर येथे लोकप्रशासन विभागप्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे होत्या. विभागप्रमुख डॉ.मिरा फड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सत्रारंभ कार्यक्रम आयोजन करण्यामागची भूमिका आणि महाविद्यालयामध्ये चालवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्रारंभी प्रमुखपाहुण्याचे शाल आणि पुष्पहार देऊन अध्यक्षातर्फे स्वागत करण्यात आले.
तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला ' अत: दीप भव' हा संदेश विद्यार्थ्यांना समजावून सांगताना डॉ. शंकर लेखने पुढे म्हणाले की, प्रत्येकाने आपला स्वतःचा गुरु होणे गरजेचे आहे. स्वतः आत डोकावून पाहणं गरजेचं आहे. स्वतःचा प्रकाश स्वतःच होणं, हे देखील तेवढेच महत्त्वाच आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंद कसा निर्माण करता येईल, यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. आई-वडिलांच्या आशा, अपेक्षा आणि भावना कशा पूर्ण करता येतील, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे,असं मौलिक प्रतिपादन डॉ.शंकर लेखने यांनी केले.व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे हिऱ्यासारख असते, कारण हिऱ्याला जेवढे जास्त पैलू तितका तो मौल्यवान ठरत असतो .पुस्तकाबरोबरच इतर क्षेत्रात सुद्धा विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असले पाहिजे. आपल्या तासभर चालल्या ओजस्वी भाषणामध्ये त्यांनी अनेक कथा आणि मौलिक दृष्टांत देऊन विद्यार्थ्यांना हसत खेळत अतिशय जीवनोपयोगी बाबी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. करिअरच्या अनेक संधी आहेत; परंतु आपल्यासाठी योग्य संधी कोणती याचा ताळमेळ बसवून विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यातील चमक आणि आनंदाश्रू हे पाहण्याचा योग म्हणजे यापेक्षा मोठे काम नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्यार्थी वर्गाच्या बाहेर बसून एवढ्या मोठ्या देशाची राज्यघटना लिहू शकतो, तर आपल्याला सगळ्या सुविधा उपलब्ध असताना देखील आपण आपलं करिअर का घडवू शकत नाही ? अशा प्रकारचा परखड सवाल त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उपस्थित केला. शेवटी लोकप्रशासन विभागातील लेफ्टनंट डॉ.आर.पी.गावंडे यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थि आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा