पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यात थोरांदळे गावामध्ये १२ व १३ एप्रिल २०२५ रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. थोरांदळे येथील श्री बजरंग बलीची मूर्ती रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केली आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते. मारुती मंदिर हे अत्यंत पुरातन आहे. मंदिरासमोर असणारी शेकडो वर्षांपूर्वीची वडाची झाडे पुरातन मंदिराची आजही साक्ष देत उभी आहेत. चैत्र पौर्णिमेच्या हनुमान जयंतीच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा थोरांदळे गावची असते. या गावात हनुमान हे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे परंपरेनुसार हनुमान जयंती उत्सवानिमित्त महाप्रसाद होत असून या महाप्रसादामध्ये तीन ते चार लाख पुऱ्या, पाच ते सहा पिंप गुळवणी, कांद्याची चटणी याचा समावेश होता.
हनुमान जयंती उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह झाला. या सप्ताहाला हनुमान प्रासादिक भजन मंडळ व आळंदीच्या विद्यार्थ्यांची चांगली साथ लाभली. नामांकित कीर्तनकारांनी सात दिवस आपले कीर्तन केले. या कीर्तनाचा लाभ परिसरातील सर्वच भक्तांनी घेतला. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ह. भ. प. विलास मिंडे महाराज यांचे हनुमान जन्माचे व काल्याचे किर्तन झाले. यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा व बैलगाड्यांच्या भव्य शर्यती झाल्या. करमणुकीचा कार्यक्रम म्हणून " लाडाची तारा " हा मराठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम झाला. हनुमान जयंती उत्सवानिमित्त झालेल्या यात्रेला गावचे ग्रामस्थ, मुंबईकर व पुणेकर मंडळी, त्याचप्रमाणे रांजणी, नागापूर, वळती, शिंगवे, भराडी, खडकी, पिंपळगाव, चांडोली, लौकी, जाधवाडी, मांजरवाडी या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हजर होते. या हनुमान जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन व नियोजन हनुमान ट्रस्टचे पदाधिकारी त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ थोरांदळे यांनी अतिशय सुंदर केले.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा