नव्या पिढीसाठी भाषेची अस्मिता जागवली पाहिजे - विजय कुवळेकर

प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचा शानदार वितरण सोहळानांदेड (प्रतिनिधी)-

भाषा हे संवादाचे आणि शिक्षणाचे माध्यम आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, परंतु त्यामुळे कोणतेही कल्याण होणार नाही. सद्यस्थितीत मराठी शाळा, मराठी मासिके, पुस्तके विक्रीची दुकाने बंद होत आहेत. दीर्घ लेखन कमी होत आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषा टिकेल का? हा आपल्यापुढे मोठा प्रश्न आहे. आपणच आपल्या भाषेबद्दलचा न्यूनगंड बाळगला तर दर्जा मिळूनही काही उपयोग नाही. आपण स्वराष्ट्राचा अभिमान बाळगतो, त्यासोबतच स्वभाषेचाही अभिमान बाळगला पाहिजे. नव्या पिढीसाठी भाषेची अस्मिता जागवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि प्रख्यात साहित्यिक विजय कुवळेकर यांनी व्यक्त केले.

नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार, दिनांक 22 मार्च रोजी नियोजन भवन येथे आयोजित वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळ्यात मातुश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मानाचे मानकरी श्री. विजय कुवळेकर हे बोलत होते. विचारपीठावर ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ व लेखक डॉ. नंदकुमार मुलमुले यांच्यासह पुरस्कारांचे मानकरी श्री. अशोकराव कोठावळे, देवा झिंजाड, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ.अनंत कडेठाणकर, छाया बेले, प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन, पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत आणि ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

विजय कुवळेकर पुढे म्हणाले, की माणसं खूप शिकली, पण संस्कारित झाली नाहीत. लोकांची महत्त्वाकांक्षा फारच वाढली, परिणामी माणूस आत्मकेंद्रित झाला. सध्या संवेदनशीलता आणि विश्वासार्हतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस प्रसारमाध्यमांच्या विश्वासार्हतेची घसरण होत असल्याचे सांगून त्यांनी विश्वासार्हता हेच खरे भांडवल आहे, परंतु सध्या विश्वासार्हताच दिसत नसल्याची खंत व्यक्त केली. आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मागील 24 वर्षांपासून अखंडपणे साहित्यिकांना  पुरस्कार प्रदान करणार्‍या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. वैद्यकीय क्षेत्रात असूनही साहित्यिकांचा गौरव करणार्‍या या पुरस्कारांना परिश्रम, साफल्य आणि कृतज्ञतेचा गंध असल्याचे नमूद केले. मन आणि शरीराच्या स्वास्थ्याचा विचार करणारा हा पुरस्कार  मिळाल्यामुळे मी धन्य झालो. बन परिवाराने आईवडिलांप्रति अत्यंत कृतज्ञ भावनेतून सुरू केलेला हा उपक्रम आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारेही शून्य विसरतात, परंतु या परिवाराने शून्य विसरले नाही, यात त्यांचे मोठेपण आहे, असे गौरवोद्गार कुवळेकर यांनी काढले.

आनंद देणारा उपक्रम- डॉ. नंदू मुलमुले

24 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रसाद प्रतिष्ठानच्या पुरस्कारांच्या बीजारोपणापासूनचा मी साक्षीदार आहे. कोणताही उपक्रम अखंडपणे चालू  ठेवणे ही साधी-सोपी बाब नाही. इतरांना सुख आणि आनंद देणे हे या उपक्रमातून दिसते.  ठरविलेले ध्येय गाठताना जीवनाची फरफट होते. ताण-तणाव वाढतो. जीवन असह्य होते. उद्दिष्टाकडे वाटचाल करणारा प्रवास आनंद देत नसेल, तर ते उद्दिष्ट कामाचे नाही. पुरस्कार हे निमित्त आहे. साहित्यिकांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोंचविण्याची संधी प्रसाद प्रतिष्ठानने मिळवून दिली आहे, असे मनोगत डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी व्यक्त केले.

यावेळी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांनी आपले अनुभवकथन करून प्रसाद प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन यांनी या सोहळ्यामागची भूमिका विषद केली. पुढील वर्ष हे पुरस्कारांचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्कारांचे मानकरी

डॉ.नंदकुमार मुलमुले यांच्या हस्ते  विजय कुवळेकर यांना मातुश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान आणि अशोकराव कोठावळे यांना ‘दीपावली’ दिवाळी अंकासाठी प्रसाद बन राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार प्रदान करण्यात आला. देवा झिंजाड यांच्या ‘एक भाकर तीन चुली’ या कादंबरीला प्रसाद बन वाङ्मय  पुरस्कार, डॉ. श्रीकांत पाटील यांच्या ‘बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा’ या निर्मितीला राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार, डॉ. अनंत कडेठाणकर यांच्या ‘लाईफ जॅकेट’ या कथासंग्रहाला प्रसाद बन राज्यस्तरीय ग्रंथगौरव पुरस्कार आणि छाया बेले यांच्या ‘हॅप्पी होमच्या भिंतीआड’ या कवितासंग्रहाला स्थानिक ग्रंथगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मान्यवरांचा अल्पपरिचय देत डॉ. सुरेश सावंत यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. वर्षा बन यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या