पहिल्याच कवितेत कवीने बाळगोपाळांना 'नदीतटावर चला मुलांनो, नदीतटावर चला' असे आवाहन केले आहे. बच्चेकंपनीला खान्देशच्या रानावनातून फिरवून आणले आहे.
'रानफुलांचा मोहक दरवळ
इथे कशाची नाही वर्दळ'
अशा शब्दांत निसर्गरम्य सफर घडवली आहे.
'फुलपाखरू' ह्या कवितेत कवीने छोट्या दोस्तांची फुलपाखराशी ओळख करून देताना म्हटले आहे :
'कुतूहलाने पाहा तुम्ही
लागले ते भिरभिरू
सप्तरंगी इंद्रधनुष्य
म्हणजे फुलपाखरू'.
'पाणी' ह्या कवितेत मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व सांगतानाच बजावले आहे :
'जाग मानवा जाग आता तू
तोडू नको रे झाडे
पुन्हा वाढू दे वनराई अन्
जंगल जिकडेतिकडे'.
कवीने आपल्या कवितेतून खानदेशाची फारच छान ओळख करून दिली आहे. जळगावची केळी भारतभर प्रसिद्ध आहे. असाच एक जळगावचा केळीवाला मुंबईत केळी विकायला जातो आणि जिवाची मुंबई करून परत येतो. कुल्फीवाला आणि आईसगोलावाला हे तर बच्चे कंपनीचे आवडते दोस्त. त्यांची खूप वाट पाहिली जाते.
'आमुचा खान्देश' ह्या कवितेत कवीने लिहिले आहे :
'शेवभाजी अन् भरीत वांग्याचे
कळणाभाकरी अन् पाटोड्या
किती पदार्थ अन् पापडही
तृप्त व्हावे खाऊन बिबड्या'.
खान्देशच्या खाद्यसंस्कृतीतील ह्या खमंग पदार्थांची नावे वाचल्यावर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही.
अजिंठ्याच्या लेणी हा तर खान्देशचा आणि संपूर्ण देशाचाच उज्ज्वल वारसा आहे. 'अजिंठा' ह्या कवितेत कवीने अजिंठ्याच्या लेण्यांची सफर घडवली आहे. शेवटी ते म्हणतात :
'काळ्या पहाडावरी नांदते
प्रेम, करुणा आणि अहिंसा
बुद्धदर्शने गळून पडते
चित्तामधली कडवी हिंसा'.
अशा प्रकारे हिंसेकडून अहिंसेकडे होणारा हा प्रवास फारच बोधप्रद आहे.
खान्देशातील मुलेसुद्धा फारच गुणी आहेत.
'शाळा' ह्या कवितेत ते म्हणतात :
'बुडवत नाही शाळा कधी
काही झाले तरी
शाळेशिवाय आम्हाला
करमत नाही घरी'.
कवीने एका कवितेत बालवाचकांना सातपुडा पर्वतरांगांतून फिरवून आणले आहे.
बालसाहित्यातून देशभक्तीचे संस्कार झाले, तर ते हवेच आहेत. 'अमुचा भारत देश' ह्या कवितेत कवीने म्हटले आहे :
'अनेक भाषा अनेक जाती असोत अनेक वेश
तरी आम्हाला प्रिय अमुचा एकच भारत देश'.
काही कवितांत आजोबा आणि नातवाच्या लडिवाळ नात्याचा सुंदर गोफ गुंफला आहे.
शिवाय काही कवितेत खोडकर टिंग्या, बाळ्या, चंगू आणि मंगू, तसेच कवीचा नातू श्रीदेखील भेटतो. त्यांच्या अवखळपणाचे किस्से मजेशीर आहेत. पुस्तकाचे महत्त्व सांगणारी कविताही छान आहे! एका कवितेत महात्मा फुले यांचे चरित्र उभे केले आहे. एका कवितेत शेतकऱ्यांच्या खडतर जीवनाचे चित्र रंगवले आहे. तात्पर्य, अशोक कोतवाल यांनी आपल्या परिसरातील निसर्ग आणि माणसे फारच छान चित्रित केली आहेत.
सरदार जाधव यांनी या कवितांना साजेशी चित्रे आणि आकर्षक मुखपृष्ठ साकारले आहे. अष्टगंध प्रकाशनाच्या संजय शिंदे यांनी आर्ट पेपरवर बहुरंगी छपाई करून पुस्तकाची निर्मिती अतिशय देखणी केली आहे! हे पुस्तक म्हणजे खरोखरीच आनंदाचे गाणे आहे. बालकुमार वाचकांना हे पुस्तक नक्की आवडेल, असा विश्वास वाटतो.
- 'गाऊ आनंदाचे गाणे' (बालकवितासंग्रह)
- कवी : अशोक कोतवाल
- मुखपृष्ठ व सजावट : सरदार जाधव
- प्रकाशक : अष्टगंध प्रकाशन, ठाणे
- पृष्ठे ४७. किंमत रु. २००
- पुस्तक परिचय :
- डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
- sureshsawant2011@yahoo.com

addComments
टिप्पणी पोस्ट करा