ज्येष्ठ बालसाहित्यकार मदन हजेरी यांची ३५हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना ४ वेळा महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार मिळाले आहेत. २४व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. बालकुमारांसाठी प्रकाशित होत असलेल्या 'खेळगडी' ह्या मासिकाच्या संपादनातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मदन हजेरी यांची 'कांदळवन' ही किशोर कादंबरी स्पर्श प्रकाशनाने नुकतीच प्रकाशित केली आहे. हल्ली नवीन पिढी निसर्गापासून तुटत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कलाकृती आश्वासक आहे. ह्या गोष्टीच्या माध्यमातून लेखकाने वाचकांना कोकणच्या गावखेड्यांतून आणि समुद्र-खाड्यांतून फिरवून आणले आहे.
कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात ही कादंबरी फुलत जाते. कोकणातील चाफेवठार ह्या गावात राहणारा किशोरवयीन सारंग हा ह्या कादंबरीचा नायक आहे. मुंबईत शिकत असलेले राणू आणि सानिका हे बहीण-भाऊ उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या गावी, चाफेवठारला आले आहेत. लेखकाने सारंग, राणू आणि सानिका यांच्या माध्यमातून बालकुमार वाचकांना कोकणची छान सहल घडवली आहे. यातून कोकणचा शेतकरी आपल्या जमिनीची भाजावळ कशी करतो, याची माहिती मिळते. कोकणातील लाल मातीचे अरुंद रस्ते, आंब्या-फणसाची झाडं, पोफळीच्या बागा, उंच झाडांचं सुरूबन, सागरातील भरती-ओहटीचा लपंडाव ह्या गोष्टी पाहून बालकुमार वाचक चांगलेच सुखावतात.
'कांदळवन' म्हणजे काय आणि पर्यावरणात त्याचे महत्त्व काय आहे, हे ह्या कादंबरीतून समजते. समुद्राकाठच्या गावांजवळ, खाड्यांच्या मुखाशी जे झाडांचे छोटे छोटे पुंजके दिसतात, त्यांनाच 'कांदळवन' असे म्हणतात. काही ठिकाणी त्यालाच 'खारफुटीचं जंगल', 'खाजणावरचं जंगल' किंवा 'चिपीचं जंगल' असेही म्हणतात. हे कांदळवन पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते. या जंगलामुळे जमिनीची होणारी झीज थांबते. मोठमोठ्या वादळांपासून गावांचे आणि प्राण्यांचे संरक्षण होते. परिसरातील लोकांना या जंगलापासून अन्न, लाकूड, चारा, सरपण आणि मध मिळते. म्हणून कोकणी माणसांनी कांदळवनांच्या संरक्षणासाठी कंबर कसली आहे.
सारंग राणू आणि सानिकाला शेताशिवारातून फिरवून आणतो. एका ठिकाणी त्यांना एका झाडावर अनेक वडवाघळं लोंबकळत असलेली दिसतात. ते पाहून सानिकाला आश्चर्य वाटते. तिघांच्या संवादातून आपल्याला वटवाघळांची जीवनशैली समजते.
कोकणी माणूस निसर्गाला घट्ट धरून राहतो. निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या वस्त्यांना 'फणसवाडी', 'आवळीची वाडी', 'सुपारीबाग', 'चाफेवठार' अशी झाडांची नावे दिली आहेत. अशी माहिती सारंगच्या आजोबांकडून मुलांना मिळते.
सारंगचे आजोबा एका होडीतून मुलांना समुद्रात फिरवून आणतात. होडी चालताना होणारा पाण्याचा 'चुबुक चुबुक' असा आवाज बालकुमार वाचकांच्या जीवनात संगीत निर्माण करतो. मासेमारी आणि खेकडे पकडणे हे कोकणी माणसांच्या उपजीविकेचे साधन आहे. मोठ्या खेकड्याला 'चिंबोरी' म्हणतात. आजोबा मुलांना तिसऱ्या, शिंपले, कालवं, काकयी, खुबे यांच्याविषयी रंजक माहिती सांगतात. कोकणी माणूस कुर्ल्याची (खेकड्याची) शेती करतो. ते खेकडे शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये नेऊन विकतात. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. असे आजोबा सांगतात. ह्या खेकडे प्रकल्पाची माहिती शहरी बालकुमार वाचकांच्या ज्ञानात भर घालणारी आहे.
सानिकाच्या नजरेसमोर एका घारीनं सापाचं जिवंत पिल्लू उचलून नेलं. ते दृश्य पाहून सानिकाला धक्काच बसला. ह्या मुलांना आणखी माहिती देण्यासाठी दुर्बिणवाले बाबलकाका ह्या मुलांना पक्षिनिरीक्षणासाठी जंगलात घेऊन जातात. त्यांना बगळा, टिटवी, फांदीवर बसलेला निळ्या, तपकिरी पंखांचा खंड्या, काळ्या डोकीचा इबिस, तपकिरी रंगाचा ढोकरी, पिवळ्या चोचीचा उंच पांढरा बगळा, छोटे पाणकावळे, पांढुरक्या रंगाचे कुरव पक्षी, पाणलावा, तुतारी असे वेगवेगळे पक्षी दाखवतात, त्यांची माहिती देतात. त्यांच्या फोटो काढतात. जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी केलेल्या पक्षिनिरीक्षणामुळे ही सफर आणखी रंजक होऊन जाते.
साटमगुरुजी ह्या मुलांना रानावनात घेऊन जातात. त्यांना झुंबराची झाडं, तिवराची झाडं आणि त्यांची पानंफुलं दाखवतात. फुलांवर बागडणारे भुंगे आणि पक्षी दाखवतात. चिपीच्या झाडांचे विविध प्रकार दाखवतात. या झाडांमुळे कांदळवनांचं सौंदर्य कसं वाढलं आहे, ते समजावून सांगतात. साटमगुरुजी जणू काही मुलांना डोळसपणे निसर्गनिरीक्षण करायला शिकवतात. तिवर, किर्पा, झुंबर, सोनचिप्पी, कांदळ, लाल कांदळ, हुरा, उंडी ही वृक्षसंपदा आणि त्यातील विविधता पाहून मुले अक्षरशः भारावून गेली.
एका ठिकाणी रंगीबेरंगी फुलपाखरांचा थवा पाहून मुले विस्मयचकित झाली. एक फुलपाखरू सानिकाच्या डोक्यावर, खांद्यावर बसलं. फुलपाखरांच्या स्पर्शाने सानिका अतिशय आनंदित झाली. निसर्गाच्या सहवासातला हा आनंद अवर्णनीय आहे!
एका ठिकाणी एक माणूस मासे पकडत होता. त्या माणसाने रेणवी, तांबोशी, काळय, बांगडे, तार्ली, मांदेली, सुरमई इ. प्रकारचे मासे पकडले होते. बाबांकडून त्याच्या मासे पकडण्याच्या डोळ लावणे आणि वाण लावणे ह्या पद्धतींची माहिती मिळते.
एके दिवशी बापू कोंडेकर घरी आले. ही मुले हट्ट करून बापूसोबत कांदळवनात जातात. बापू म्हणजे म्हव काढून मोहळाचा मधुर मध मिळविण्यात पटाईत माणूस. त्यांनी मोहळाच्या पोळ्यावर सिगारेटचा धूर सोडून मधमाश्यांना पळवून लावले आणि मधाचे पोळे असलेली फांदी अलगद काढून घेतली. मधाच्या पोळ्याची प्रमाणबद्ध रचना पाहून मुले थक्क झाली. मध खाऊन जशी ती तृप्त होतात, तशीच मधमाश्यांविषयीची माहिती मिळाल्यावर समाधान पावतात.
एके दिवशी सारंगच्या बाबांनी ह्या मुलांना समुद्रकिनारी नेऊन पाणमांजरं दाखवली. त्यांच्याविषयी माहिती दिली. मुलांनी प्रश्न विचारून पाणमांजरं कुठे राहतात आणि काय खातात, याची अधिकची माहिती घेतली.
उन्हाळ्याची सुट्टी संपत आली आणि राण्या-सान्याची मुंबईला परत जायची वेळ आली. सारंगमुळे ह्या बहीण-भावाला खूप काही पाहायला आणि शिकायला मिळाले होते. सारंगचे आजोबा हे आता सगळ्यांचेच लाडके आजोबा झाले होते.
शहरातील बंदिस्त संस्कार शिबिरापेक्षा कांदळवनात खूप काही शिकायला मिळाले, याचे समाधान घेऊन राण्या-सान्या हे बहीण-भाऊ मुंबईला परत निघतात. बिनभिंतीच्या उघड्या शाळेत जीवनशिक्षण घेतल्याचे समाधान त्यांच्या चेहर्यांवर झळकत असते.
'कांदळवन' ह्या कादंबरीतील पावठणी, तिस-या, पगोल्या, कुर्ल्या, बोडसं, रस्सा, चिंबोरी ह्या शब्दांमुळे कोकणी बोलीभाषेचा लहेजा लक्षात येतो. ह्या कादंबरीत सारंग, सानिका, राणू, बाबा, आजोबा, बापू, साटमगुरुजी ही प्रमुख पात्रे असली, तरी कोकणचा समृद्ध निसर्ग हे एक अतिशय महत्त्वाचे पात्र आहे. ह्या बहुरूपी निसर्गामुळेच ही किशोर कादंबरी अधिक उत्कंठावर्धक आणि वाचनीय झाली आहे. ह्या कादंबरीतून कोकणातील जैवविविधतेचा फार जवळून परिचय होतो. कोकण हीच लेखकाची जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्यामुळे ह्या कलाकृतीत कोकणचा निसर्ग सर्वार्थाने सजला आहे, नटला आहे. ह्या माध्यमातून लेखकाने कोकणच्या पर्यावरणसंरक्षण आणि संवर्धनाकडे लक्ष वेधले आहे. ह्या कादंबरीतून कोकणचे लोकजीवन आणि खाद्यसंस्कृतीचा छान परिचय झाला आहे.
चित्रकार गोपाळ नांदुरकर यांनी चितारलेले मुखपृष्ठ आणि आतील चित्रांनी कथानकाला अक्षरशः गळामिठी मारली आहे. हे पुस्तक वाचत असताना कोकणावरची डॉक्युमेंटरी पाहात असल्याचा भास होतो. एका सिद्धहस्त लेखकाच्या ह्या पुस्तकाच्या माध्यमातून होणारी ही कोकणची सहल बालकुमार वाचकांना समृद्ध करणारी आहे.
कांदळवन (किशोर कादंबरी)
लेखक : मदन हजेरी
मुखपृष्ठ व आतील सजावट : गोपाळ नांदुरकर
पृष्ठे : ४० किंमत रु. १२०
प्रकाशक : स्पर्श प्रकाशन, राजापूर
पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

addComments
टिप्पणी पोस्ट करा