*मराठी भाषा टिकविण्यासाठी लेखकांनी मायबोली भाषेत लेखन करावे* - रामदास फुटाणे


महाराष्ट्रात अनेक दिवाळी अंक निघत असून दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे भूषण आहे, तर देहू व आळंदी ही महाराष्ट्राची विद्यापीठे आहेत.  मराठी भाषा टिकवण्यासाठी लेखकांनी आपले लेख , कथा व कविता मायबोली भाषेत लिहावे,  हे लेखन नक्कीच दर्जेदार असेल.  पुढच्या पिढीसाठी इंग्रजी देखील आले पाहिजे,  असे स्पष्ट उद्गार चित्रपट निर्माते.  दिग्दर्शक,  व्यंगकवी श्री. रामदास फुटाणे यांनी जाहीर सभेत काढले.

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने २८  व्या पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांकाचे च प्रकाशन २८ नोव्हेंबर  २०२४ रोजी बॅलार्ड पिअर येथील पोर्ट ट्रस्टच्या विजयदीप कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे चित्रपट निर्माते,  दिग्दर्शक आणि व्यंगकवी श्री. रामदास फुटाणे आणि मुंबई पोर्ट  प्राधिकरणाचे सचिव श्री. पी. एन. बाहेकर यांच्या हस्ते झाले.  दीप प्रज्वलनाने प्रकाशन सोहळ्याची  सुरुवात झाली.

याप्रसंगी रामदास फुटाणे आपल्या मार्गदर्शक भाषणात  पुढे  म्हणाले की,  मुंबई एअरपोर्ट जसे अदानीच्या ताब्यात गेले ,  तसेच वाढवण बंदर देखील भविष्यात  अदानीच्या ताब्यात जाईल. सत्ताधाऱ्यांनी जातीपातीचे राजकारण करून समाज व्यवस्था खिळखिळी केली आहे. जातीच्या नावाखाली आंदोलन केली जातात. समाज घडविण्याऐवजी समाज मोडण्याचेच काम चालू आहे. राजकारणात आपणाला खूप जागरूक राहिले पाहिजे. राजकारणात तळमळीपेक्षा मळीचाच जास्त वास येतो.आज सक्रिय राजकारणी एका बाजूला तर निष्क्रिय राजकारणी दुसऱ्या बाजूला आहेत.  समाज जसं जीवन जगतो,  तसं आम्ही लेखन करतो. समाजाच्या सुखदुःखाशी आपण समरस असले पाहिजे. कोरोनाने आपणास खूप काही शिकवले त्यापासून आपण धडा घेतला पाहिजे. आपणास सध्याचे अर्थकारण बदललं पाहिजे. चांगभलं या कवितेतून सर्वांच भलं होवो असा संदेश दिला आहे.  पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकात पन्नास टक्के कामगार लिहितात,  हे पाहून मला आनंद वाटतो.  दिवाळी अंक वाचल्याने आपली वैचारिक पातळी वाढते. 

ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस. के. शेट्ये यांनी अध्यक्षीय भाषण  सांगितले की,  निष्ठावंत कार्यकर्ते ही युनियनची खरी शक्ती आहे. आमच्याकडे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते असल्यामुळे गेली १०४  वर्ष  जुनी असलेली युनियन टिकून आहे.  यापुढेही भविष्यात  युनियन कामगारांची सेवा करीत  राहील. रामदास फुटाणे यांच्याबाबत ॲड. एस. के. शेट्ये म्हणाले की,  त्यांच्या स्मरणशक्तीला मी सलाम करतो. त्यांचे मार्गदर्शन हे हास्य फुलवणारे आहे.  आज खऱ्या अर्थाने अशा मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. 

युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्रात ३५० ते ४०० दिवाळी अंक निघतात. परंतु  कोणाचाही असा प्रकाशन सोहळा होत नाही. १ जानेवारी २०२२  पासून लागू होणारा वेतन करार २७ सप्टेंबर २०२४  रोजी मुंबईत संपन्न झाला. त्याची अंमलबजावणी होण्यासाठी गोदी कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.  मला वाटते की,   आंदोलनाच्या या इशाऱ्याने थोड्याच दिवसात वेतन कराराची अंमलबजावणी होईल.  प्रास्ताविक भाषण कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय युनियनचे सेक्रेटरी व  माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन  सतिश घाडी यांनी केले तर आभार सेक्रेटरी विजय रणदिवे यांनी मानले. प्रकाशन सोहळ्यास मुंबई पोर्ट प्राधिकरणचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सचिव बापू घाडीगावकर,   मुंबई टांकसाळ मजदुर सभेचे संजय सावंत, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनगुटकर, गणित तज्ञ व राष्ट्रपती पुरस्कार विजेते नारायण गव्हाणे, नुसीचे मकसूद खान, सलीम झगडे, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, बंधुत्व फाउंडेशनचे अध्यक्ष समीर राणे, मराठा विकास प्रतिष्ठानचे सहसचिव  ज्ञानेश्वर जाधव, मुंबई पोर्ट ट्रस्ट एस. सी. एस.टी. वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी अंकुश कांबळे, गिरीश कांबळे, विजय कांबळे, युनियनचे  आदी मान्यवर उपस्थित होते. संगीता  कदम, शीला भगत, योगिनी  दुराफे  यांनी स्वागतगीत म्हंटले. याप्रसंगी मान्यवर व लेखकांना " पोर्ट ट्रस्ट कामगार अंक " देऊन सन्मान करण्यात आला.  प्रकाशन सोहळ्याला युनियनचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, पोर्ट ट्रस्टचे कामगार, सेवानिवृत्त कामगार, खाजगी कामगार, लेखक व कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला

 मारुती विश्वासराव

प्रसिद्धीप्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या