मुंबई कस्टम्सचे जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांची १०२ वी जयंती साजरी*

साठ-सत्तरच्या दशकात मुंबई  बंदरातून  स्मगलिंग   करणाऱ्या अनेक स्मगलरांना  धडा शिकवणारे व कायद्याचा वचक व दरारा निर्माण करणारे मुंबई कस्टमचे हिरो  जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांची १०२  वी जयंती २ जुलै २०२४ रोजी मुंबई कस्टमच्या दयाशंकर सभागृहामध्ये  सीमाशुल्कचे प्रधान मुख्य  आयुक्त श्री. पी.के. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाली.

 सकाळी ११  वाजता मुंबई कस्टमच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम झाला.

त्यानंतर दुपारी ३ वाजता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्रिडा प्रकारात  विशेष कामगिरी बजावणाऱ्या कस्टम्स डिपार्टमेंटच्या क्रीडापटूंना जमादार बापू लक्ष्मण लामखडे ह्यांच्या नावाने विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी श्री. पी. के. अग्रवाल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,  दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळविणारे जमादार बापू लक्ष्मण लामखडे हे मुंबई कस्टमचे हिरो होते. पुढील वर्षापासून २ जुलै हा दिवस कस्टम्समध्ये क्रिडा दिवस म्हणून व जुलैचा पहिला आठवडा हा क्रीडा सप्ताह (स्पोर्ट्स वीक)  म्हणून साजरा केला जाईल. क्रीडा क्षेत्रातील सर्व खेळाडूंचे  पुरस्कार देऊन कौतुक केले जाईल. यापुढे दरवर्षी जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाईल. जुन्नर तालुक्यातील मंगरूळ पारगाव या त्यांच्या जन्मगावी असलेल्या  पुतळ्याजवळ एक महिन्यात सरकारी इतमामात कस्टमचा अधिकृत  ध्वज फडकवला जाईल. त्यांच्या गावातील लोकांना  अभिमान वाटावा की, जमादार बापू लक्ष्मण लामखडे हे केवळ  गावचे हिरो  नसून ते भारतीय कस्टमचे हिरो आहेत. हे आपणास दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी मुंबई कस्टमची पूर्ण टीम गणवेशमध्ये त्यांच्या गावी जाऊन मुंबई कस्टमचा ध्वज फडकवेल. 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी पार्क येथील समर्थ व्यायाम मंदिराचे प्रमुख आणि पद्मश्रीने  सन्मानित श्री. उदय देशपांडे यांनी कस्टममध्ये कामाला असताना त्यांना क्रीडा क्षेत्रात  आलेल्या  आठवणींना उजाळा दिला. तर क्रिडा क्षेत्रातील मानाचा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त श्री. क्लेरन्स लोबो  यांनी जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांची जयंती साजरी करून, त्यानिमित्त क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचा गुणगौरव केल्याबद्दल मुंबई कस्टम ग्रुप सी ऑफिसर्स युनियनचे पदाधिकारी, कस्टमचे अधिकारी व कर्मचारी यांचे  अभिनंदन केले.

याप्रसंगी  प्रास्ताविक भाषण ऑल इंडिया कस्टम्स ग्रुप  सी ऑफिसर्स फेडरेशनचे अध्यक्ष श्री.  संतोष पेडणेकर यांनी केले. व्यासपीठावर मुंबई सीमा शुल्कचे मुख्य  प्रधान आयुक्त श्री . पी. के. अग्रवाल , मुख्य आयुक्त श्री. सुनील जैन,अतिरिक्त आयुक्त श्री. अरविंद घुगे, पद्मश्री उदय देशपांडे व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्लेरंस लोबो आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन यशस्विनी भालेराव यांनी केले तर आभार मुंबई कस्टम्स ग्रुप सी ऑफिसर्स  युनियनचे अध्यक्ष श्री. अजित शिंदे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुंबई कस्टम ग्रुप सी ऑफिसर्स  युनियनच्या  सर्वच पदाधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत घेऊन प्रत्येकाने आपापले काम चोख पार पाडले. कार्यक्रमास 'आसरा  मुक्तांगण' चे प्रबंध संपादक व  माजी कस्टम्स अधिक्षक श्री.मोहन शिरकर,  पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकाचे सहसंपादक बाळकृष्ण लोहोटे,  कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव , ऑल इंडिया कस्टम्स अँड सेंट्रल एक्साईज ग्रुप सी फेडरेशनचे माजी अध्यक्ष श्री. विजय गायकवाड, सेक्रेटरी श्री. संजय नारकर, श्री . परब तसेच जमादार बापू लामखडे यांचे मानसपुत्र श्री. जयवंत दाभाडे  आदी मान्यवर  त्याचप्रमाणे कस्टमचे अधिकारी व कर्मचारी   मोठ्या संख्येने उपस्थित  होते. 

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या