99 ज्येष्ठ व 32 दिव्यांग मतदारांनी केले ‘होम वोटिंग’

किनवट,दि.22 (प्रतिनिधी) : हिंगोली लोकसभेतील किनवट विधानसभा क्षेत्रात शनिवार व रविवार (दि.20 व 21 एप्रिल) रोजी 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले 99 ज्येष्ठ नागरिक व 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग  असलेल्या 32 मतदारांनी टपाली मतदानाद्वारे आपल्या घरी बसून मतदानाचा हक्क बजावला.

   भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या लोकसभेसाठी प्रथमच गृहमतदान प्रक्रिया राबविली जात आहे. यापूर्वी टपाली मतदानाची सुविधा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध होती.

 किनवट मतदारसंघामध्ये 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेले एकूण मतदार 03 हजार 497 असून, त्यात पुरुष 1,216 तर स्त्री मतदार 1,281 व इतर 0 आहेत.  तसेच  एकूण दिव्यांग मतदार 02 हजार 275 असून, त्यात पुरुष 1,388 तर स्त्री मतदार 887 व इतर 0 आहेत. त्यापैकी जे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग  मतदार अजिबात चालू फिरू शकत नाहीत व बेडवरच आहेत, अशा 106 ज्येष्ठ नागरिकांनी व 34 दिव्यांग मतदारांनी 12 (ड) फार्म बीएलओ कडे भरून दिला होता. त्यामुळे त्यांच्या ‘होम वोटिंग’ सोय करण्यात आली होती. दि.20 व 21 रोजी मतदान अधिकारी, नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी, व्हिडिओग्राफर, मॉयक्रोऑब्जर्वर (सूक्ष्म निरीक्षक) व एक हत्यारी पोलिस यांची टीम 12 ड फार्म भरलेल्या मतदारांच्या घरी जाऊन त्यांनी मतदान नोंदविल्यानंतर मतदान पेटीत ते बॅलेट पेपर जमा करण्यात आले. यामध्ये 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या एकूण  99 ज्येष्ठ नागरिक व 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग  असलेल्या 32 मतदारांनी टपाली मतदानाद्वारे आपल्या घरी बसूनच मतदानाचा हक्क बजावला. यात 12 डी फार्म भरून मतदान केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची टक्केवारी 93 असून, दिव्यांगांचे मतदान 94 टक्के झालेले आहे. यात पूर्णत: गोपनीयता राखून ही टपाली मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचे उपरोक्त टीममधील प्रा.तपनकुमार मिश्रा यांनी सांगितले.

 उर्वरीत ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांपैकी जे चालू फिरु शकतात अशा सर्व मतदारांना दि.26 एप्रिल या मतदानाच्या दिवशी  ऑटोरिक्षाची व्यवस्था करून स्वयंसेवक मतदान केंद्रापर्यंत आणून, त्यांचे मतदान होईपर्यंत साहाय्य करणार आहेत, अशी माहिती मीडिया कक्षातील मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी दिली.

टिप्पण्या