नांदेड: लिंबगाव येथे सुरू असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. आनंद अष्टूरकर बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, पर्यावरण संवर्धनात प्रत्येक भारतीय नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे. पण त्यातल्या त्यात युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. कारण आजचा युवक उद्याचा नागरिक आहे. युवक पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक असेल तर प्रदूषण होणे अशक्य आहे. त्याबरोबरच घात करणारे प्रदूषण आपण थांबवले पाहिजे. म्हणजे आवाज करणारे जे कारखाने आहेत त्यात काम करणाऱ्या कामगारांचे कान निकामी होतात. असे आवाजाचे प्रदूषण करणारे कारखाने शासनाने बंद केले पाहिजे किंवा त्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. त्याबरोबरच नुसते पर्यावरण संरक्षण करून उपयोग नाही तर पर्यावरणाचा शाश्वत विकास करणे पुढच्या पिढ्यांसाठी आवश्यक आहे. पर्यावरण सुदृढ करण्यावरही आम्ही भर देणे आवश्यक आहे अन्यथा येणारा काळ आपणास माफ करणार नाही. त्यासाठी पर्यावरणाच्या बाबतीत आपण सर्वांनीच जागृत राहिले पाहिजे असा उपदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालयातील सांख्यिकी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ.के. वाय. इंगळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.तन्वी ठाकूर हिने केले तर आभार विठ्ठल गायकवाड या विद्यार्थ्याने मानले. विचारमंचावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. चंद्रशेखर एंगडे, डॉ. अतिश राठोड, डॉ. आशा मेश्राम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

addComments
टिप्पणी पोस्ट करा