माहूर (प्रतिनिधी ) किनवट व माहूर हे बंजारा बहुल तालुके सन 1956 पूर्वी तेलंगणा राज्यातील असिफाबाद व आदिलाबाद जिल्ह्यात होते.मराठवाड्यातील अनेक जिल्हे सुद्धा आंध्र प्रदेश व तेलंगणात होते.शासनाच्या परिपत्रकानुसार मराठवाड्यातील बंजारा समाजाला आदीवासी म्हणून अनुसूचित जमातीत समाविष्ट करा,अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष किनवट-माहूर विधानसभा सचिव शिवचरण रेवा राठोड यांनी दि.1 नोव्हे. 2023 रोजी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
बंजारा समाज हा १४ राज्यात विखुरला असून महाराष्ट्रात भटक्या विमुक्त, नजीकच्या आंध्रप्रदेश व तेलंगणात अनुसूचित जमाती, उत्तर प्रदेशात अनुसूचित जमाती, तमिळनाडू व कर्नाटकमध्ये ओबीसी, दिल्लीत अनुसूचित जाती तर काही राज्यात ओबीसी म्हणून या समाजाच्या नोंदी असून केवळ केरळ राज्यात उच्चवर्णीय अशी नोंद असल्याचा उल्लेख शिवचरण राठोड यांनी दिलेल्या निवेदनात आहे. किनवट-माहूर नव्हे तर सर्व मराठवाड्यातील बंजारा समाजाचे नातलग नजीकच्या आंध्र, तेलंगनात वास्तव्यास असून तेलंगणातील अनेक बंजारा खासदार व आमदारांची अनुसूचित जमाती म्हणून नोंद आहे.केवळ भाषावार प्रांत रचनेत महाराष्ट्रात यावे लागले ही काय बंजारा समाजाची चूक आहे काय असा प्रश्नही त्यांनी त्यात उपस्थित केला आहे.महाराष्ट्रात बंजारा समाजाचे दोन मुख्यमंत्री व अनेक मंत्र्यांनी या राज्याचा कारभार हाकला आहे.आताच्या मंत्रिमंडळातही या समाजाचे मंत्री आहेत,परंतु त्यांनी मराठवाड्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्या संदर्भात चकार शब्द काढला नसल्याची खंत राठोड यांनी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी राष्ट्रपतीसह सर्व संबंधितांना पाठविल्या आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा