केंद्र सरकारने १ जानेवारी २००४ पासून भरती झालेल्या कामगारांना नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. त्यामुळे रेल्वे, पोर्ट, संरक्षण, सरकारी व निम सरकारी आणि खाजगी उद्योगधंद्यात नवीन भरती झालेल्या कामगारांवर मोठा अन्याय झाला आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करून, जुनी पेन्शन योजना लागू करावी, या एकमेव मागणीसाठी दिल्लीत रामलीला मैदानावर रेल्वे कामगारांनी दोन लाखाचा मोर्चा काढला होता. २०२४ मध्ये कोणत्याही परिस्थितीत जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, त्यासाठी भारतातील रेल्वे कामगार संघर्ष करण्यास तयार आहे, असे स्पष्ट आव्हान ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी शिवकुमार मिश्रा यांनी जाहीर सभेत केले.
ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे ९९ वे अधिवेशन ८ ऑक्टोबर २०२३ रोजी परेल येथील कामगार मैदानावर संपन्न झाले. सदर अधिवेशनाचे नियोजन सेंट्रल व कोकण रेल्वेच्या नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने उत्तमरीत्या केले होते. याप्रसंगी रेल्वे फेडरेशनचे महामंत्री शिवकुमार मिश्रा यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, रेल्वेतील कंत्राटीकरणाला आमचा कडाडून विरोध आहे. जुनी पेन्शन योजना ही मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. या मागणीसाठी रेल्वेतील कामगार तीव्र लढा देण्यास केव्हाही तयार आहेत.
नॅशनल रेल्वेमेन्स युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉ. वेणू नायर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, रेल्वेतील अडीच लाख रिकाम्या जागा त्वरित भराव्यात, चार लेबर कोर्ट रद्द झाले पाहिजे, भायखळा प्रिंटिंग प्रेस व परेल वर्कशॉप बंद करता कामा नये, या महत्त्वाच्या मागण्या फेडरेशनतर्फे घेण्यात आलेल्या आहेत. कोरोना काळात रेल्वे कामगारांनी रेल्वे चालू ठेऊन देश सेवा केली आहे. १ जानेवारी २००४ पासून लागू झालेली नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. ही सर्व कामगार चळवळीची मागणी आहे.
याप्रसंगी सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर नरेश लालवानी, वेस्टन रेल्वेचे जनरल मॅनेजर अशोक कुमार मिश्रा, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे कामगार नेते जे. आर. भोसले इत्यादी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. अधिवेशन प्रसंगी नॅशनल रेल्वेमेन्स युनियनचे पदाधिकारी प्रदीप शिंदे, महाराष्ट्र सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर, १०८ वर्षाचे रेल्वेमेन्स फेडरेशनचे पदाधिकारी के. एल. गुप्त उपस्थित होते. आभार नॅशनल रेल्वेमेन्स युनियनच्या महिला अध्यक्षा कामाक्षी बागलवाडीकर यांनी मानले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हुतात्मा झालेल्या कामगारांना पुष्पहार अर्पण करण्यात आले . सांस्कृतिक कार्यक्रमानंतर राष्ट्रगीताने अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनाला भारतातून रेल्वेचे जवळजवळ आठ ते नऊ हजार कामगार उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा