देशात विकासासह,जगात भारताचा सन्मान वाढवण्याचे कार्य मोदींनी केले-अमित शहा
नांदेड/,दि. देशाचा विकास साधतानाच, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर भारताचा सन्मान आणि गौरव वाढवला असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेड येथील जाहीर सभेत व्यक्त केले.
भारत माता की जय, जय भवानी-जय शिवाजी! असे उद्घोषित करत, नांदेडकरांसह महाराष्ट्र वासियांचे आभार मानण्यासाठी मी येथे आल्याचे त्यांनी प्रथमताः स्पष्ट केले. यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळातील लोककल्याणकारी महत्वपूर्ण आणि ठळक कार्याची उपस्थितांना उजळणी करून दाखवली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला फैलावर घेतले. एकाच घराण्याचे नाव न घेता, काँग्रेसच्या चार पिढ्यांच्या शासनातील भ्रष्टाचार तसेच सामान्यांच्या जनकल्याणासाठीची त्यांची असंवेदनशीलता शहांनी अधोरेखित केली.
मोदी सरकारने महाराष्ट्रात केलेल्या कार्याचा उल्लेख करताना, त्यांनी २०१४ साली राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना युतीच्या शासनातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्याची स्तुती केली. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान देखील दिले. हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी ट्रिपल तलाक,राम मंदिर, कॉमन सिविल कोड आणि मुस्लिम आरक्षण यावरची आपली भूमिका स्पष्ट करावी असे ते म्हणाले. स्वतःच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी असलेली युती तोडून, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाशी सलगी केल्याचा आरोपही त्यांनी केला.येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातून ४५ पेक्षा अधिकचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लोकांना आवाहन आणि विनंती केली.
सुरुवातीस प्रवीण दरेकर आणि केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनीही मोदी सरकारने केलेल्या कार्याची जनतेला माहिती देत, आठवण करून दिली.
नांदेडकरांसाठी "आदर्श" शब्दाचा अर्थ वेगळाच !
यजमानांच्या भूमिकेतून नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नांदेडच्या विकासासाठीच्या अनेक मागण्या मांडत, अनेक समस्यांचेही वर्णन केले.त्याआधी त्यांनी आपल्या चार वर्षाच्या कार्यकाळात, नांदेड मध्ये झालेला ठळक विकास स्पष्ट केला. अशोकराव चव्हाण यांच्यावर शरसंधान करताना, त्यांनी अमित शहा यांना उद्देशून नांदेडकरांना आदर्श या शब्दाचा वेगळाच अर्थ माहित असल्याचा टोला लगावला.
अमित शहा यांच्या मार्गदर्शनापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विशेष शैलीत विरोधकांवर जोरदार टीका केली. यात शरद पवार आणि अशोक चव्हाण यांचा विशेष उल्लेख होता. मोदीजींच्या मार्गदर्शनात, आपल्या पाच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील केलेली कामे, तसेच आताच्या एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार मधील लोकोपयोगी निर्णयाची त्यांनी माहिती दिली. तसेच खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि जिल्ह्यातील इतर भाजपा,सेना आमदारांनी केलेल्या मागण्यांची व घेतलेले संकल्प यांची पूर्तता सध्याचे सरकार करेल असे ठाम आश्वासन देत, या सर्वांना बळ दिले.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, लातूरचे खासदार शृंगारे, आ. प्रवीण दरेकर, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री धीरजसिंह रावत यांच्यासह अन्य अनेक आजी-माजी आमदार, मंत्री, खासदार यांची उपस्थिती होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा