सकारात्मकता पेरणा-या बालकथा : 'मिठू मिठू' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

मुंबईच्या प्रा. प्रतिभा सराफ ह्या एक नामवंत कवयित्री, लेखिका, समीक्षक आणि गझलकार आहेत. त्यांची मोठ्यांसाठी ७ पुस्तके प्रकाशित झाली असून बालकुमारांसाठी त्यांचा 'मिठू मिठू' हा कथासंग्रह ठाणे येथील व्यास क्रियेशन्सने दि. ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाशित केला आहे. ६० पृष्ठांच्या ह्या संग्रहात ८ बालकथा आहेत.

सृजन, संस्कार आणि सकारात्मकतेचे टॉनिक देणा-या ह्या बालकथा आहेत. लेखिकेने आपल्या बालपणातील घटना- प्रसंगांचे स्मरणरंजन करून ह्या कथा रंगविल्या आहेत. यातील काही कथा लेखिकेच्या बालमित्र - मैत्रिणींच्या जीवनातील घटना-प्रसंगांवर आधारित आहेत.

शालेय जीवनात शिक्षकाने एखाद्या विद्यार्थ्याच्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप किती प्रेरणादायी ठरू शकते, हे 'पाठीवर थाप' ही कथा वाचल्यावर आपल्या लक्षात येते. मराठीच्या शिक्षिका सामंतबाई यांनी विद्यार्थ्यांना समाजातील कोणत्याही व्यक्तीची मुलाखत घ्यायला सांगितले होते. लेखिकेने सातवीत असताना कचरावेचक मुलाची मुलाखत घेतली होती. ती सामंतबाईंना दाखविली असता त्या अतिशय खूश झाल्या. त्यांनी प्रतिभाची पाठ थोपटली आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितले, ही मुलगी आयुष्यात एक चांगली लेखिका होणार.

लेखिकेने लिहिले आहे, आजही तो प्रसंग आठवला की माझा आत्मविश्वास दुणावतो. ह्या कथेत लेखिकेने, 'माणसाला भीक मागण्याची लाज वाटली पाहिजे, कष्ट करायची नाही', हा संदेश दिला आहे.

'अभिमान' ही लेखिकेच्या बालपणातील कल्पकतेची आणि जागरूकतेची साक्ष देणारी छान कथा आहे. बालपणी लेखिका मैत्रिणींसह शाळेतून घरी जात असताना त्यांना एका घरातून खूप धूर येताना दिसला. मैत्रिणी घाबरल्या, पण लेखिका घाबरली नाही. तिने त्या घरात जाऊन काकांना सावध केले. जबाबदारीने सतर्कता दाखवल्याबद्दल त्या काकांनी लेखिकेला, खर्च न करता कायम जपून ठेवण्यासाठी एक रुपयाचे नाणे बक्षीस दिले. ते नाणे लेखिकेने आजही जपून ठेवले आहे. आपल्याकडे जपून ठेवण्यासारखे काही तरी आहे, याचा लेखिकेला अभिमान वाटतो. या कथेत लेखिकेने बालकुमारांना वीजबचत करण्याचा सल्ला दिला आहे. 

'भद्रकाली' ही लेखिकेच्या शेजारी राहणाऱ्या एका बालमित्राची गोष्ट आहे. ह्या मुलाने लहानपणी लेखिकेच्या घरातून दोनशे रुपयांची चोरी केली होती. सधन घरातील हा मुलगा वाईट मार्गाला लागून वाया जाऊ नये म्हणून लेखिकेच्या आईवडलांनी भद्रकालीच्या आईवडलांना वेळीच सावध केले. लेखिकेच्या भावंडांसोबत राहून भद्रकाली सुधारला, समजूतदार झाला. चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन इन्स्पेक्टर झाला. भद्रकाली निरोप घेण्यासाठी आला, त्या वेळी लेखिकेच्या वडलांनी आशीर्वाद देताना सांगितले, "सचोटी, संवेदनशीलता आणि संयम ठेव". हे तीनच शब्द, पण लाख मोलाचे आहेत. 

वेळीच मार्गदर्शन मिळाले, तर असे अनेक भद्रकाली सन्मार्गाला लागू शकतात अन्यथा जीवनातून उठू शकतात. 

'पहिली लढाई' ह्या कथेत लेखिकेने आपल्या बालपणातील एक कसोटीचा प्रसंग कथन केला आहे. बालपणी लेखिकेच्या हातून चुकून मैत्रिणीला गोटी लागली. मैत्रिणीची आई भांडायला आली. त्या वेळी लेखिकेच्या आईने सांगितले, क्षमा मागून तुझा तू प्रश्न सोडव. लेखिकेने आपला प्रश्न आपणच सोडवला. लेखिका म्हणते, कोणत्याही प्रसंगाला स्वतः हिमतीने कसे तोंड द्यायचे, याचे प्रशिक्षण मला मिळाले. ती 'पहिली लढाई' जिंकल्याचे समाधान मला मिळाले.

पुढे लेखिकेच्या मुलीवर असाच प्रसंग ओढवला. मुलीनेही पुढाकार घेऊन आपला प्रश्न आपणच सोडवला. लेखिकेने लिहिले आहे, तिच्या आयुष्यातील 'पहिली लढाई' तिनेही आज जिंकली आहे.

पालकांनी केलेले संस्कार, दिलेले जीवनशिक्षण वाया जात नाही, हाच ह्या कथेचा सार आहे.

कोणते शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करतात, हे विद्यार्थ्यांना बरोबर समजते. कधीकधी आईवडील आणि शिक्षक आपल्या भल्याचाच विचार करतात, हे पौगंडावस्थेतील मुलामुलींच्या लक्षात येत नाही. ते अकारण गैरसमज करून घेतात. गैरसमजाचे ढग पळाले, की सगळे आकाश स्वच्छ होते. 'ऑल दि बेस्ट, बेटा'

ही कथा अशाच विषयावर आधारित आहे. 'सावत्र आईवडील' ह्या कथेतही हाच पौगंडावस्थेतील मुलामुलींचा विषय हाताळला आहे. 'मिठू मिठू' ह्या कथेत पाणीबचतीचा संदेश दिला आहे. 


'दिवे लावणे' ह्या कथेत लेखिकेने ग्रामीण जीवनाचे फारच छान दर्शन घडविले आहे. 'दिवे लावणे' ह्या वाक्प्रचाराचे विविध पैलू उलगडून दाखविले आहेत.'गगनी दिवे लावल्याचे समाधान मला निश्चितच आहे' ह्या वाक्याने कथेचा समारोप केला आहे. 

लेखिकेची चित्रकार कन्या निकिता सराफ हिने पुस्तकाचे अतिशय देखणे मुखपृष्ठ आणि आतील बोलकी कथाचित्रे रेखाटली आहेत. ह्या पुस्तकाला अरविंद मुळे यांची प्रस्तावना लाभली असून डॉ. विजया वाड यांनी ह्या पुस्तकाची पाठराखण केली आहे. 

ह्या सर्वच कथांमध्ये सहजता आणि स्वाभाविकता आहे. लेखिकेने बालकुमारांच्या भावभावनांचे खेळ फार छान टिपले आहेत. शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे स्वभावविशेष चितारले आहेत. आपल्या बालपणातील घटनाप्रसंग सांगत असताना कोणताही उपदेश केला नाही. प्रत्येक कथेत लेखिकेतील संवादी शिक्षिका जागी आहे, हे सतत जाणवते. प्रत्येक कथेतून डोळस आणि सकारात्मक विचार व्यक्त झालेला आहे. ह्या सर्वच बालकुमार वाचकांची भाषिक जाण समृद्ध करणा-या कथा आहेत. ह्या कथांमधील सर्वच पात्रे स्वतंत्र विचारांची, स्वतंत्र प्रज्ञा प्रतिभेची, अनुभवातून शिकणारी, परिस्थितीची आव्हाने स्वीकारून उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाणारी आहेत. लेखिकेची भाषा अतिशय समृद्ध असल्यामुळे ह्या पुस्तकातून वाचकांचे भाषाशिक्षणही चांगले होते.


'मिठू मिठू' (बालकथासंग्रह)

लेखिका : प्रा. प्रतिभा सराफ

मुखपृष्ठ : निकिता सराफ

प्रकाशक : व्यास क्रियेशन्स, ठाणे.

पृष्ठे ६० किंमत रु. १००


sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या