मुंबई दि.१० : काळाचौकी येथील बंद इंदू मिल नं.२ च्या जमिनीवर उभ्या रहाणा-या बहुचर्चित"टेक्सटाइल म्युझियम"च्या पहिल्या टप्प्यातील काम संपत आले आहे.लवकरच दुसऱ्या आणि महत्त्वाच्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.तेव्हा सर्व संबंधितांचे लक्ष लागून राहिलेले हे काम जागतिक दर्जाचे व्हावे,अशी मागणी कामगार नेते आमदार सचिन अहिर यांनी प्रकल्पाच्या भेटी दरम्यान केली आहे.
वस्त्रोद्योग संग्रहालयाला शनिवारी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी एका शिष्टमंडळाद्वारे भेट दिली
दोन वर्षापूर्वी सुरु केलेले हे "वस्त्रोद्योग संग्रहालयाच्या"पहिल्या टप्प्यातील काम आता जवळपास संपत आले आहे.दुस-या टप्प्यातील काम सुरू व्हायचे आहे.त्यात ख-या अर्थाने वस्त्रोद्योग संग्रहालयाचे काम होणार असून प्रकल्पासाठी एकूण ४४००० चौ.मी.जमीन वापरात येणार आहे,अशी माहिती उपस्थित अधिका-यां कडून देण्यात आली. मुंबई विकास नियमावली अंतर्गत मुंबई महापालिका हा प्रकल्प राबवीत आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईच्या कापड उद्योगातील कामगारांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.कामगार महर्षी स्व.गं.द.आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय मिल मजदूर संघाने सन.१९४७ पासून मुंबईतील कापड कामगारांचे नेतृत्व केले आहे.संघटनेचे हे अमृतम होत्सवी वर्ष आहे.
वस्त्रोद्योग आणि संघटनेचे अतूट नाते लक्षात घेऊन केवळ आत्मियतेपोटी आपण या प्रकल्पाला भेट देत असल्याचे या प्रसंगी सचिन अहिर यांनी सांगितले.
या संग्रहासाठी मुंबई महानगर पालिकेने "कहाणी गिरणगावाची"ही चित्रफीत तयार केली आहे.त्यात महत्त्वाच्या कामगार नेत्यांची माहिती देण्यात आली आहे.तसेच माहिती फलक तयार करण्यात आले आहेत,अशी माहितीही या प्रसंगी उपस्थित महापालिकेच्या
अधिका-यांनी दिली आहे.
संग्रहालयात वस्त्रोद्योगातील जुनी यंत्रसामुग्री आणि तत्कालीन कामगार चळवळीचा इतिहास अधोरेखिला जावा, अशी अपेक्षा सचिन अहिर यांनी या प्रसंगी व्यक्त केली.आज विविध उद्योगाच्या व्यवस्थापनात नव्याने दाखल होणाऱ्या प्रशिक्षित तरुणांना किवा अभ्यासकांना हा प्रकल्प निश्चितच लक्षद्वीपा सारखा मार्गदर्शक ठरेल, अशी आशा सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे.तेव्हा हा प्रकल्प जागतिक दर्जाचा व्हावा,अशी मागणी करून,आपण या कामाला नैतिक जबाबदारी म्हणून सहकार्य करू,असेही सचिन अहिर यांनी या प्रसंगी सांगितले आहे.
शिष्टमंळात सरचिटणीस गोविंदराव मोहिते आणि सर्वश्री निवृत्ती देसाई अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर आदी पदाधिकारी होते.


COMMENTS