सेलूत फिट इंडिया फ्रिडम रॅलीला प्रतिसाद
स्वच्छता व आरोग्याचा संदेश देण्यासाठी अधिकारी ३ किमी धावले
(सेलू) निरामय आरोग्य व सार्वजनिक स्वच्छतेचे संस्कार भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अमुल्य भेट आहे, राष्ट्रपीता महात्मा गांधींनी ही स्वातंत्र्य चळवळीला या संस्कार मुल्यांची जोड दिली, सुदृढ समाज व राष्ट्रउभारणी साठी समाजातील प्रत्येक घटकाने या विचारांचे अनुकरण करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी सौ अरूणा संगेवार यांनी केले.
रविवार ता ०२ आक्टोबर रोजी म.गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालय सेलू, नगर परिषद व गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिट इंडिया फ्रीडम रॅलीचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.
या प्रसंगी तहसीलदार दिनेश झांपले, मुख्याधिकारी देविदास जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे,पोलीस उपनिरीक्षक माधव लोकुलवार,उपमुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक प्रा नागेश कान्हेकर डी डी सोन्नेकर,तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, मुख्याध्यापक रामप्रसाद गोरे,रविंद्र पाठक,महादेव खरात यांची उपस्थिती होती.
सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेच्या बाबतीत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी यांच्या पुतळ्या पासुन, गोविंद बाबा चौक, स्टेशन रोड ,पारीख कॉलनी मार्गे नूतन विद्यालयात स्वातंत्र्य सेनानी श्रीरामजी भांगडीया यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ३ कि.मी.रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या रॅलीत नूतन विद्यालय व कस्तुरबा गांधी बालीका विद्यालयातील ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यशवंत विद्यालयाच्या वतीने रॅलीत सहभागी सर्व अधिकारी व विद्यार्थांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ काशीनाथ पल्लेवाड, तर आभार सुभाष मोहकरे यांनी मानले.रॅलीच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक सतीश नावाडे, सुनील गायकवाड, रावसाहेब पदमपल्ले,आश्विन केदासे,विरेश कडगे,मारोती खाडे, विश्वंभर जैन , न.प.मल्लिकार्जुन स्वामी,आनंद काबरा,डी.के. बायस,अन्सर रंगरेज,महेंद्र ढाले, महादु उगले आदींनी परीश्रम घेतले.


COMMENTS