किनवट - पेसातंर्गत क्षेत्र असलेल्या किनवट - माहूर तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा अन...
किनवट - पेसातंर्गत क्षेत्र असलेल्या किनवट - माहूर तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी मंत्रालय,जि.प.स्तरावर पाठपुरावा केला.त्यामुळे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात २६२ पैकी १३९ जागा भरल्या आहेत.विशेष म्हणजे माहूर येथे तब्बल १५ वर्षांपासून रिक्त असलेल्या उर्दू शिक्षकाच्या ४ तर किनवटमध्ये १ जागा भरण्यात आली. किनवट - माहूर तालुक्यात पदवीधर शिक्षक ६४,प्राथमिक शिक्षक १८१ तर मुख्याध्यापकाच्या १७ जागा रिक्त होत्या.पेसातंर्गत क्षेत्र असल्याने कोणत्याही शासकीय कार्यालयात कोणतेच पद रिक्त ठेवता येत नसताना उपरोक्त दोन्ही तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून तब्बल २६२ पदे रिक्तच होती.यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.याबाबत आमदार भीमराव केराम यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी केली.त्यानंतर दि.२२ सप्टेंबर रोजी त्यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे यांचीही भेट घेऊन रिक्त जागा भरण्याबाबत पाठपुरावा केला.शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात किनवट तालुक्यात ८०, तर माहूर तालुक्यात शिक्षक,मुख्याध्यापकांच्या ५९ जागांचा अनुशेष भरला आहे.दुसऱ्या टप्प्यात लवकरच उर्वरित जागा भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

COMMENTS