किनवट - तालुक्याच्या इस्लापूर परिसरातील जलधारा शासकीय आश्रमशाळेच्या ११ विद्यार्थ्यांना मंगळवारी दि.२० जेवणातून विषबाधा झाली.११ पैकी ४ विद्...
किनवट - तालुक्याच्या इस्लापूर परिसरातील जलधारा शासकीय आश्रमशाळेच्या ११ विद्यार्थ्यांना मंगळवारी दि.२० जेवणातून विषबाधा झाली.११ पैकी ४ विद्यार्थ्यांवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात ,तर ७ विद्यार्थ्यांवर हिमायतनगर येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून,सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी दिली.
जलधारा येथील शासकीय आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी रोजच्याप्रमाणे सकाळचे जेवण घेतले.जेवणाच्या काही वेळानंतर शाळेतील विद्यार्थिनी चांदणी मेंढके,जयश्री डुडूळे,काजल तांबारे,सरिता पिंपळे,दिव्या ढोले,ओमसाई ढाले,श्रध्दा शेळके,वंदना डुकरे,सरिता ढोले या विद्यार्थ्यांना मळमळ,उलटी,चक्कर येत होती.याप्रकारानंतर शाळेचे अधीक्षक ए.एस.सूर्यवंशी व अन्य शिक्षकांनी आजारी विद्यार्थ्यांना शाळेच्या जवळच असलेल्या जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचारासाठी नेले.प्रथमोपचारानंतर रुग्णवाहिकेने ७ विद्यार्थ्यांना हिमायतनगरच्या आरोग्य केंद्रात,तर ४ विद्यार्थ्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.या घटनेनंतर शाळेतील ५१६ विद्यार्थ्यांची जलधारा,शिवणी,बोधडी इस्लापूर,अप्पाराव पेठ आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या मदतीने तपासणी करण्यात आली.सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी या घटनेची माहिती घेतल्यानंतर विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला.आमदार भीमराव केराम यांनीही घटनेचा आढावा घेऊन वैद्यकीय सेवा तातडीने पुरविण्याच्या सूचना केल्या.

COMMENTS