नांदेड. (विशेष प्रतिनिधी) जिल्हा आणि पोलीस प्रशासनाकडून ठरवून देण्यात आलेल्या नियम व अटींचे पालन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व शांततेत साजरी करावी, असे नम्र आवाहन नांदेड ग्रामीण ठाण्यातील पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी केले.
नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात २ एप्रिल रोजी आगामी सण तथा उत्सव अनुक्रमे- रामनवमी, भिमजयंती, महाविर जयंती, हनुमान जयंती, रमजान ईद, श्री परशुराम जंयती तथा महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर नवीन नांदेड परिसरातील विविध भिमजयंती मंडळाचे पदाधिकारी व त्यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच शांतता समीती पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीस उपस्थित सिडको-हडको परिसरातील उपरोल्लेखित विविध जयंतीमंडळाचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पो.नि. अशोक घोरबांड बोलत होते. यावेळी विचार मंचावर सहाय्यक पो.नि. सुरेश थोरात, पोउपनि. माणिक हंबर्डे व विशेष शाखेचे पोलीस नाईक बालाजी दंतापल्ले आदींची उपस्थिती होती.
शांतता समितीच्या बैठकीस उपस्थित विविध भिमजयंती मंडळांचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पो. नि. घोरबांड पुढे म्हणाले, सद्यस्थितीमध्ये सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांच्याआधारे वाटचाल करणे काळाची गरज आहे. तरूण बांधवांनी दारू पिवून भिमजयंतीच्या मिरवणुकीमध्ये नाचू नये. याशिवाय, दारू पिऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान, कोणताही वाद-विवाद तथा धिंगाणा घालू नये. जयंती मिरवणुकीत दारू पिवून धिंगाणा घालणाऱ्यांची व विचित्र हावभाव करून नाचणाऱ्यांची कसलीच गय केली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगून प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून भिमजयंती व आगामी सण-उत्सव अगदी शांततेत व उत्साहात साजरे करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन पो. नि. अशोक घोरबांड यांनी केले. या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड, जगदीश भुरे, राजू वाघमारे, राजकुमार ढवळे, सुरज चिंतोरे,रवी तारू, लक्ष्मीबाई पैठणे, जयश्रीबाई ढवळे, महेंद्र सोनकांबळे,भुजंगराव सोनकांबळे, उदयकुमार पाध्ये, मुख्तारखान पठाण,मुख्तारसाब शेख, शेेे. युनूस, शेख आझम, मो. यासिन हफीस अस्लम, जयवंंत पवार, रविकुमार जोंधळे, मधुकर चौदंते, महेश लांडगे, निखील सोनकांबळे यांचेसह त्यांचे सहकारी पदाधिकारी व बहुसंख्य सामाजिक कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. बैठकीचे प्रास्ताविक सहाय्यक पोनि. सुरेश थोरात यांनी केले,तर पोउपनि. माणिक हंबर्डे तसेच जिल्हा विशेष शाखेचे पोलीस नाईक बालाजी दंतापल्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS