नांदेड. (विशेष प्रतिनिधी) नांदेडच्या 'सिडको' परिसरातील नांदेड ते उस्माननगर मुख्य रस्त्याशेजारी 'कृष्णा' नावाचे किराणा दुकान आहे. या दुकानासमोर बेकायदेशीररित्या गुटखा विक्री करण्याच्या हेतूने साडेचार हजार रूपयांचा विविध कंपनीचा प्रतिबंधित गुटखा आपल्या ताब्यात बाळगल्याच्या आरोपावरुन अखेर नांदेड ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीस गजाआड केले. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणेसहाचेदरम्यान नवीन नांदेडात घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड 'ग्रामीण' ठाण्यातील डी.बी. अर्थात गुन्हे शोध पथकाचे सपोनि. संकेत दिघे आणि त्यांचे सहकारी पोलीस नाईक प्रमोद कऱ्हाळे, संतोष जाधव, पो. कॉ. विश्वनाथ पवार हे नेहमीप्रमाणेच १४ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेचेदरम्यान, प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, गुरूवारी सायंकाळी पावणेसहावाजेदरम्यान, विशेष गुन्हे शोधपथकातील उपरोक्त सर्व कर्मचारी हे ढवळे कॉर्नर ते उस्माननगर रोडवरील कृष्णा किराणा दुकानासमोर आले. त्याचवेळी, एक इसम कृष्णा किराणा दुकानाच्या बाजूस हातामध्ये एक पांढरे छोटे पोते घेवून थांबलेला पोलिसांना आढळला. दरम्यान, पोलिसांना त्याठिकाणी हातात पांढरे पोते घेवून थांबलेल्या इसमाचा संशय आल्याने त्यांनी त्या पोत्यात काय आहे, म्हणून तपासणी केली. तपासणीदरम्यान, त्या पोत्यात महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्याच्यादृष्टीने बंदी घालण्यात आलेल्या अन्नपदार्थाचा साठा आढळून आला आहे. पोलिसांनी, त्या इसमाचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव कृष्णा प्रल्हादराव मोरे (रा. बाभूळगाव ता. जि. नांदेड ह.मु. ज्ञानेश्वरनगर, हडको, नांदेड) मालक तसेच विक्रेता असे असल्याचे सांगितले, अशी माहिती पो. ना. प्रमोद कऱ्हाळे यांनी दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून उपरोक्त आरोपीसह त्याचे ताब्यात असलेल्या छोटे पोत्यातील प्रिमियम राजनिवास सुंगधित पानमसाला (३२ पुडे किंमती अंदाजे ३ हजार ५२० रूपये) तसेच सुगंधित तंबाखू (३१ पुडे किंमती अंदाजे ९३० रुपये) असा एकूण ४ हजार ४५० रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थ अर्थात गुटखासाठा ताब्यात घेतला असल्याचे विश्वसनीय पोलीस सूत्रांनी सांगितले.
याप्रकरणी पोलीस नाईक प्रमोद गोविंदराव कऱ्हाळे यांनी दिलेल्या तक्रारीचेआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आरोपी कृष्णा प्रल्हाद मोरे याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सुरेश थोरात व पो.कॉ. भगवान गिते हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
COMMENTS