नांदेड.(विशेष प्रतिनिधी) दर्शनासाठी गेलेल्या मित्रांसोबत नदीच्या काठावर पाय पाण्यात सोडून बसला असताना पाण्यात पडून बुडालेल्या एका १८ वर्षीय तरूणाचा अखेर ९ ऑगस्ट रोजी सकाळी मृतदेह आढळून आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या गाडीपुरा परिसरातील रहिवासी श्री उर्फ ओंकार रविंद्र बरडे हा ८ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेचेदरम्यान, त्याचा कौठा येथील मित्र 'साई' याचेसोबत विष्णूपुरी येथील काळेश्वर मंदिरात गेला. त्याचवेळी, ओंकार बर्डे तसेच त्याचा मित्र साई यांनी महादेवाचे दर्शन घेतले. दरम्यान, विष्णूपुरी परिसरातील गोदावरी नदीच्या काठावर पाय पाण्यात सोडून बसले असता, दुपारी तीनचे सुमारास ओंकार पाण्यात पडला. एकवेळेस वर येवून 'तो' नंतर पाण्यात बुडून मरण पावला, असे 'त्या'चा मित्र साई यानेच ओंकार बरडे यांच्या आईस
फोन करून कळविले असता, त्याचे आई आणि वडील घटनास्थळी जावून पाहणी केली. मात्र, त्यांचा पाण्यात बुडालेल्या मुलगा ओंकार बर्डे याचा मृतदेह रविवारी रात्री उशिरापर्यंत पाण्याच्यावर आला नाही.
विशेष म्हणजे, प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण ठाण्यातील सहाय्यक पो. नि. सुरेश थोरात, पोलीस नाईक नामदेव सूर्यवंशी यांनी ८ ऑगस्ट रोजी दिवसभर जीवरक्षकांच्या मदतीने शोध मोहीम राबविली. मात्र, रात्री उशिरापर्यंत ओंकार उर्फ श्री बरडे याचा मृतदेह आढळून आला नाही. तद्नंतर ९ ऑगस्ट रोजी सकाळी जीवरक्षकांनी पुन्हा उपरोक्त घटनास्थळावरील नदीच्या पात्रातील पाण्यात शोध घेतला असता, अखेर ओंकार बरडे याचा मृतदेहच हाती लागला आहे, अशी माहिती पोलीस ठाणे अंमलदार ज्ञानोबा गिते व मदतनीस पो.कॉ. अश्विनी मस्के यांनी दिली आहे.
याप्रकरणी रवींद्र नारायण बर्डे यांच्या माहितीआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात ९ ऑगस्ट रोजी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. प्र. पो.नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉनस्टेबल माधव गवळी याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, श्री ओंकार बरडे याच्या अकाली निधनाबद्दल नांदेडच्या सिडको तसेच गाडीपुरा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
COMMENTS