श्री काळेश्वर मंदिर 'संस्थान'चा निर्णय
नांदेड.(विशेष प्रतिनिधी) 'कोरोना' या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर यंदाही विष्णूपुरी परिसरातील श्री काळेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंदच राहणार आहे, अशी माहिती 'काळेश्वर' मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर व त्यांच्या अन्य सहकारी विश्वस्त मंडळींनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
'कोरोना' या महाभयंकर साथरोगाच्या पार्श्वभूमीवर व कोरोनाचा सद्यस्थितीतील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून श्री काळेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने गतवर्षीप्रमाणेच यंदादेखील श्रावण महिन्यात काळेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, उपरोल्लेखित परिस्थिती लक्षात घेऊन श्रावण महिन्यात श्री काळेश्वराच्या भाविकांनी दर्शनासाठी श्री काळेश्वर मंदिर परिसरात येवू नये, असे आवाहनही प्रस्तुत मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी ७ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या बैठकीतच करण्यात आले आहे. या बैठकीला श्री काळेश्वर मंदिर संस्थानचे सचिव शंकरराव हंबर्डे, कोषाध्यक्ष उत्तमराव हंबर्डे तसेच त्यांचे सहकारी विश्वस्त बालाजीराव हंबर्डे, गणेश धनमणे व नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

COMMENTS