सोनपेठ/प्रतिनिधी
खरीप हंगाम २०२० चा पीकविमा मंजूर झालेला असूनही शेतकऱ्यांना पिक विम्याच्या रक्कमेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू आहे.हा प्रकार लाजीरवाणा असून आम्हाला भीक नको मात्र आमचा हक्क देण्याची मागणी कान्हेगावचे ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर मोकाशे यांनी कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की,खरीप हंगाम २०२० चा शेळगाव मंडळाचा पीकविमा मंजूर होऊन अनेक दिवस लोटले तरीही विमा कंपनी आणि प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर एक छदामही जमा करण्यात आलेला नाही.यावर्षी शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला आहे.मात्र यापूर्वीचे पिकविम्यापोटी असणारे पैसे देण्यात आलेले नसल्याने यावर अवलंबून असणारा शेतकरी मोठ्या अडचणीचा सामना करत असून तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याची रक्कम जमा करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.अन्यथा कृषी आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदनावर माणिक कोरडे,सूरज मोकाशे,सतीश सातपुते,गणेश मोकाशे,लक्ष्मण कोरडे,शशिकांत मोकाशे यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS