राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )एकाच दिवशी चार ठिकाणी घर फोडून लाखोंच्या ऐवजावर ताव मारल्याने निर्ढावलेल्या अज्ञात चोरट्यांनी शनिवारी उशीरा रात्री 2 वाजताचे सुमारास भाजपाचे शहराध्यक्ष तथा प्रतिष्ठीत व्यापारी गोपु उपाख्य सागर महामुने यांचे घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न चालविला असता घरातील मंडळी जागे झाल्याने त्यांनी पळ काढला.दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होत असल्या बाबत व्यापारी,राजकीय पुढारी व पत्रकारांनी दूसरे दिवशी स.11 वा. पोलीस ठाणे गाठून तिव्र नाराजी व्यक्त केली.
चोरीच्या उद्देशाने 6 चोरट्यांनी घरात प्रवेश करून महामुने यांच्या आई शोभा महामुने यांना घेराव घातला,आणि त्यांचे तोंड दबण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे घरात काही तरी गडबड असल्याचा सुगावा लागल्याने दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या गोपु महामुने खाली आल्याचे पाहून चोरांनी पळ काढला.पाठलाग केल्यावर एक चोर त्यांच्या हातीही लागला.मात्र हाताच्या कोप-याने पोटावर जबरदस्त वार करून त्याने आपली सुटका करून घेतली.चोरट्यांनी यावेळीही आजुबाजुच्या घराच्या दारांची कडी लावली होती हे विशेष.
शहरात चो-याचे प्रमाण वाढल्याने शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा भाजपाचे युवानेते सुमित राठोड,माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी,राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान, वसंत कपाटे, विजय आमले,अनिल वाघमारे,गजानन भारती, सरफराज दोसाणी,अपील बेलखोडे,राजू दराडे आदिंनी पोलीस ठाणे गाठून पोलीसावर अनेक प्रश्नांची सरबती केली.
सदर प्रकरणी गोपु महामुने यांनी रितसर तक्रार दाखल केल्या नंतर पोलीसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांनी महामुने यांच्या घरी जावून विचारपूस केली.

COMMENTS