*महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगल्या अधिकाऱ्यांचे वावडे:-रेवडकर*
सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी
कडक शिस्तीच्या शिस्तप्रिय नुतन जिल्हाधिकारी आंचल गोयल या परभणी जिल्हाधिकारी म्हणून शनिवार ३१ जुलै रोजी रुजू होणार होत्या मात्र त्या रुजू होऊ नयेत म्हणून जिल्ह्यातील काही सत्तारूढ पक्षाच्या नेतेमंडळींनी सरकार दरबारी स्वतःची प्रतिष्ठा पणास लावून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष सुशील रेवडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.त्यांनी पत्रकात असे नमूद केले आहे की,प्रशासकीय क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. जिल्हाधिकारी मुगळीकर हे शनिवारी सेवानिवृत्त होणार आहेत.या गोष्टीची कल्पना राज्याच्या सचिवापासून प्रशासकीय यंत्रणेला होती.त्यांच्या या जागी नुतन जिल्हाधिकारी म्हणून कडक शिस्त असणाऱ्या श्रीमती गोयल या रुजू होणार होत्या.शनिवारी दुपारी त्या जिल्हाधिकारी या पदाचा पदभार स्वीकारतील असे अपेक्षित होते. त्यादृष्टीने त्या गेल्या दोन दिवसापूर्वी परभणीत दाखल झाल्या होत्या.प्रशासकीय स्तरावर सुद्धा अधिकारी-कर्मचारी अलर्ट होते.परंतु शनिवारी सकाळपासून नूतन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल या रुजू होऊ नयेत म्हणून या जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी जोरदार मोर्चेबांधणी करीत शासकीय स्तरावरून श्रीमती गोयल यांच्यावर पदभार स्वीकारू नये म्हणून दबावतंत्राचा प्रकार सुरू केला.परिणामी दुपारी तीन वाजेपर्यंत गोयल यांनी पदभार स्वीकारला नाही.दरम्यान त्यांच्याऐवजी कनिष्ठ अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी पदाचा पदभार सुपूर्त व्हावा असा कुटीर उद्योग या जिल्ह्यातील काही नेते मंडळींनी सुरू केला होता.या त्यांच्या कुटीरपणास यश येऊन मंत्रालयातून सहसचिव अजित पाटील यांचा आदेश धडकला यात अप्पर जिल्हाधिकारी यांना पदभार देऊन पदमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले होते.विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते,त्यावेळेस काहीचे येथून मुंबई पर्यंत हे कुटीर उद्योग सुरू होते,परंतु पालकमंत्री मलिक यांनी या प्रकाराबाबत आपणास काहीही माहिती नाही,असे नमूद करीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.दुपारी उशिरापर्यंत जिल्ह्यातील ज्या लोकप्रतिनिधींच्या या खेळयामुळे प्रशासकीय स्तरावर तीव्र संताप व्यक्त होत होता,या नाट्यमय घडामोडींमुळे गोयल पदभार स्वीकारणार की नाही याविषयी कमालीच्या शंका-कुशंका निर्माण झाल्या होत्या.नूतन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल या गेल्या दोन दिवसापासून परभणीत दाखल झाल्या आहेत.मात्र धडकलेल्या या आदेशानुसार महाविकास आघाडीतील माफियांना खुले रान झाल्याची चर्चा जिल्ह्यात होत असल्याचा आरोपही सुशील रेवडकर यांनी केला आहे.

COMMENTS