l
नायगांव प्रतिनिधी
(रामप्रसाद चन्नावार )
जिल्ह्यातील वयोवृद्ध ज्येष्ठ कलावंत व साहित्यिक यांची दोन वर्षापासून कलावंत समिती गठीत करण्यात आली नसून नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील कलावंताचे प्रस्ताव जिल्हा परिषद समाज कल्याण येथे धुळ खात असल्याने मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कलावंतासाठी समिती गठित करून त्वरित प्रस्ताव मंजूर करावे अशी मागणी अ. भा. मराठी शाहीर परिषदचे शाहीर बळीराम जाधव व शाहीर माधव बैलकवाड यांनी केली आहे.
गेल्या दोन वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील कलावंत समिती गठीत नसल्याने ती समिती गठित करुन जिल्ह्यातील कलावंतांचे मानधन मिळावे यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले होते व यासह सांस्कृतिक संचालनालय मुंबई, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडेही कलावंताच्या समस्यांविषयी निवेदन देण्यात आले असून आजपर्यंत कोणीही या कलावंत प्रश्नाविषयी पुढील निर्णय न घेतल्यामुळे आणि या लाॅकडावून काळात कित्येक कलावंत, साहित्यिकावर उपासमारीची वेळ आली आहे, शासनाच्या विविध कार्यक्रमासाठी किंवा मंत्री महोदय येण्याअगोदर जनता एकत्र जमा करण्यासाठी शाहिरांचे कलापथक हवे असते, पण त्यांच्या प्रश्नाविषयी उदासीनता असावी. तेव्हा कलावंत समिती गठीत करावी व त्वरित प्रस्ताव मंजूर करावे अशी मागणी अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे नायगाव तालुका अध्यक्ष शाहीर बळीराम जाधव सुजलेगावकर तर उपाध्यक्ष शाहीर माधव बैलकवाड यांनी ही मागणी केली आहे.
COMMENTS