जगाचा पोशिंदा शेतकरी खरंच राजा होईल का ?
- पिळवणूक करणाऱ्या यंत्रणेने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल
शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा आणि शेतकरी राजा, असे म्हटले जाते. मात्र शेतकरी राजा, जगाचा पोशिंदा कोणत्या अवस्थेत जीवन जगत आहे. त्याकडे मात्र कोणीही पाहायला तयार नाही.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक होते. त्यांची पिळवणूक होऊ नये, म्हणून चांगले चांगले कायदे होणे आणि त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक होते. मात्र तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे बाजारपेठेतील खरेदी-विक्री करणारे दलाल, आडते शेतकऱ्यांची सातत्याने परवड करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
शेतकऱ्याचा माल बाजारात आला की, तीन हजार रुपये क्विंटल जर भाव असेल तर तो दीड हजारावर येतो. आणि महिना-दीड महिन्यात शेतकऱ्यां जवळच सर्व मला एकदा बाजारपेठेत पोहोचला आणि शेतकऱ्यांकडून विक्री झाला की, दीड हजार रुपयांनी खरेदी केलेला माल दोन महिन्यांनी तीन हजार रुपये क्विंटल होतो, या बाबी आपण सातत्याने पाहत आहोत.
बाजार समिती, खरेदी विक्री संघ, साखर कारखाने, वखार महामंडळ किंवा अशा प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी उभारले गेलेल्या संस्था खरंच शेतकऱ्यांसाठी काम करतात का ? यावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होते. आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चाललेली गळचेपी त्या त्या वेळी उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसते.
बाजार पेठेतील दलाल, बाजार समित्या, खरेदी विक्री संघ, खरेदी विक्रीतील मक्तेदारी, या सर्व प्रकारांनी शेतकऱ्याला हैराण करून सोडले आहे. पण शेतकऱ्याला ही लबाडी रोखण्यासाठी पुढे येण्यासाठी वेळ नाही आणि तो संघटित नसल्यामुळे हे सर्व प्रकार चालली आहेत.
सरकार, व्यापारी संघटना हे संघटित रीतीने काम करत असताना दिसून येत आहेत. कारण घोळ घालणाऱ्या बाजारपेठा या सरकार मधील लोकांच्या असल्यामुळे या बाजारपेठांवर कारवाई करण्याचे धाडस सरकार दाखवत नाही. आणि त्यामुळे शेतकरी एकटाच असल्याची खंत वारंवार सिद्ध होत असून स्वातंत्र्याचे नंतर देखील शेतकरी दबावाखाली असल्याचे सर्वच जण पाहत आहेत.
पिक विमा योजना असो, की पिक कर्ज योजना असो, यात होत असलेली गळचेपी शेतकऱ्यां बरोबरच शेतकरी नसलेली जनता ही सातत्याने पाहत आहे. हक्काचे पीक कर्ज शेतकर्यांना दिले जात नाही. मात्र या बँका अन्य लोकांना आणि शेतकऱ्यांचे पीक कर्जाच्या वेळेला मात्र त्यांना अडचण कशी निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना त्रास कसा देता येईल, याकडे मोठ्या प्रमाणात पाहत असतात. त्यावेळी राज्याचे आणि जिल्हा, तालुक्याचे सहकार खाते मूग गिळून गप्प बसलेले असतात.
शेतकऱ्यांना मिळणारा हक्काचा राशन माल नियमाप्रमाणे मिळत नसून शासनाच्या योजना, शेतकऱ्यांसाठी दिले जाणारे अनुदान, या वितरीत करणाऱ्यांनी शेतकऱ्याला जोखडून टाकले आहे. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत. हा एक चिंतनाचा विषय होऊन बसला आहे.
हे सर्व प्रकार पाहता शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी हा राज आहे, उपमा असल्याचं स्पष्ट होतं. कारण शेतकऱ्यांना होत असलेला त्रास विचारात घेतला जात नसल्याने शासन पातळीवर चांगली व्यवस्था होताना दिसत नाही.
अर्थात सर्वच यंत्रणा शेतकऱ्यांना त्रास देत आहेत किंवा शेतकऱ्यांसाठी काम करत नाहीत, असे नाही. काही चांगल्या यंत्रणा आणि लोकांमुळे देखील शेतकऱ्यांना आज थोडा बहुत न्याय मिळत आहे. मात्र अनेक लोक शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्याला जागेवर आणण्यासाठी अन यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाहीत हे एक दुर्दैव आहे.
ग्रामीण भागातील नाळ जोडलेल्या आणि शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या लोकांना शेतकऱ्यांचे प्रश्न पूर्णपणे माहीत आहेत. कदाचित लांबून पाहणाऱ्यांना ते समजत नसतील. मात्र ८० टक्के वर समाज हा शेतकऱ्यां मधून पुढे येतो. या समाजाने शेतकऱ्यांच्या मागण्या आणि शेतकऱ्यांची भावना ओळखले नाहीत, हा देखील एक प्रश्न आहे.
कोरडवाहू शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना आजही गावांमध्ये पाणी उपलब्ध करून देता आले नाही. ज्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते ते पाणी अडवून त्या भागातील शेतकऱ्यांना देता आले नाही. याची प्रत्येक जिल्ह्यात शेकड्यावर नाही तर हजारावर उदाहरणे दिसतील. मग त्या भागातील पुढारी नेमके काय करतात. विकासाचा येणारा निधी या कामासाठी का वापरला जात नाही. आणि शेतकऱ्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न का होत नाही ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
हल्ली शेतकऱ्यांना मजूर मिळणेही दुरापास्त होत चाललेली आहे. वाढती मजुरी देणे त्यांना परवडत नाही. केवळ शेती पडीक न पाडण्यासाठी शेती करणे एवढाच एक पर्याय अनेक शेतकऱ्यांकडे आता उपलब्ध असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही शेती करण्याचं स्वारस्य किंवा उत्साह कसा राहील.
अनेक वेळेस शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीला देखील तोंड द्यावे लागते. त्यावेळी अचानक उद्भवलेल्या या आपत्ती आपत्तीमुळे शेतकऱ्याचे न भरून येणारे नुकसान होते. आणि संकट ग्रस्त शेतकरी काय करावे ? या विचाराने त्रस्त असतो. अशा वेळी शेतकरी हा राजा किंवा पोशिंदा या शब्दातून बाहेर निघून मदतीसाठी विनंती करतो. त्याला योग्य प्रकारची मदत देखील बराच वेळा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल होत असतो.
या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या काही पिढ्या उभ्या राहण्याऐवजी त्या नुकसानीत आलेल्या आहेत. यातून काही शेतकरी वेगळेच निर्णय घेऊन जीवन संपवत असल्याचेही प्रकार वाढत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून याकडे समाजानेही लक्ष देणे आवश्यक आहे.
थोडक्यात स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांना गुलामाची वागणूक सहन करावी लागत आहे. त्याच्या गरजा लहान असतानाही त्याला कायद्याने संरक्षण दिले जात नाही. त्यामुळे व्यवस्था निर्माण करणारे कायदे शेतकऱ्याला त्रासदायक ठरत असून त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यास तयार नाहीत.
एकंदरीत शेतकरी हा राजाही जगाचा पोशिंदा आहे, हे शंभर टक्के खरे आहे. मात्र तो वरचेवर हतबल होत चाललेला आहे. शेतकर्यांमधील ऐंशी टक्के शेतकरी हा सध्या त्रस्त आहे. जोडधंदा असलेला शेतकरी हा आपल्या शेतीत काहीतरी नवीन करण्याचे स्वप्न पाहत आहे. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांकडे समाज आणि सरकार या दोघांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्याच्या वाताहतीला हेच जबाबदार ठरतील
अँड. अजित एम. देशमुख,
बीड
---------

COMMENTS