जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये देशभरातील अनेक राज्यांमध्ये अयोध्येमधील भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलन करण्यात आलं. जानेवारी महिन्याच्या मध्यापासून सुरु झालेली ही मोहीम २७ फेब्रुवारीपर्यंत राबवण्यात आली. अनेकांनी या मोहिमेमध्ये आपला खारीचा वाटा म्हणत जमेल त्या पद्धतीने पैसे देणगी म्हणून दिले.
यामध्ये अगदी सर्वसामान्यांपासून ते राजकारणामधील अनेक वरिष्ठ नेत्यांनाही देणगी दिल्याचे पहायला मिळालं. या देणगी गोळा करण्याच्या मोहिमेची सांगता झाली असली तरी सोशल नेटवर्किंगवर या मोहिमेदरम्यान एका भक्ताने दिलेला धनादेश सध्या चर्चेचा विषय ठरतोय. हा धनादेश दोन लाख १४ हजार २१४ रुपयांचा आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रच्या नावाने दोन लाख १४ हजार २१४ रुपयांचा धनादेश देण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र या धनादेशावर आकड्यांमध्ये रक्कम लिहिताना २१४२१४ हे इंग्रजीमध्ये अशापद्धतीने लिहिलं आहे की ते देवनागरीमधील रामराम असं वाचता येत आहे.
सध्या या धनादेशाचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून धनादेश देणाऱ्या व्यक्तीच्या क्रिएटीव्हीचं कौतुक होताना दिसत आहे. व्हायरल फोटोमध्ये आकड्यांमध्ये लिहिण्यात आलेल्या रक्कमेकडे लक्ष जावं म्हणून त्याकडे बाण दाखवत, “रक्कम नाही तर क्रिएटीव्हीटी पाहा”, असं म्हटलं आहे...!

COMMENTS