केज, (प्रतिनिधी)
केज तालुक्यातील सर्वधर्मसमभाव मानणारे आणि कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता एकोप्याने व गुण्यागोविंदाने राहणारे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे गाव म्हणजे नाव्होली या गावचे ग्रामदैवत खंडोबा असल्याने या दैवताची प्रत्येक वर्षी गावात यात्रा भरवली जाते. यात्रेनिमित्त लंगर , कुस्ती व पालखी मिरवणूक केले जातात. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नाजुक असल्याने गावकऱ्यांनी बैठक घेवून या वर्षी कुसत्याचा कार्यक्रम न घेता पंरपरा म्हणून फक्त लंगर तोडण्याचा निर्णय घेतल्याने काल रविवार रोजी सकाळी नऊ वाजता गावातून बँडच्या निनादात व तोफांच्या आतषबाजीत चार लंगरची गावातून मिरवणूक काढून खंडोबा मंदिरासमोर लंगर तोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक, गावातील लहानथोर , आनंदाने सहभागी झाले होते. यात महिलांची ऊपस्थिती लक्षणिय होती.
काही वर्षापूर्वी गावातील काही लोकांना पिसाळलेल्या कुत्रे चावल्याने त्यात त्यांचा म्रुत्यु झाला होता. तेंव्हापासून गावात खंडोबा देवाची यात्रा सुरुवात झाली. असल्याचे गावातील वयस्कर मंडळी कडुन सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही खंडोबा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या वर्षी आलेल्या कोरोना महामारी या संकटामुळे यात्रेच्या नियोजनात बदल करत यावर्षी कुस्त्या हा मर्दानी खेळ रद्द करून फक्त लंगर तोडण्याचा सर्वानुमते निर्णय झाल्याने रविवारी दुपारी बारा वाजता फक्त लंगर तोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमसाठी आजी माजी सरपंच, उपसरपंच ,चेअरमन ऊपस्थित होते. या हजारोंच्या ऊपस्थितीत श्री.पांडुरंग येडबा बिक्कड ,बाळासाहेब रघुनाथ बिक्कड, दत्तात्रय अनिल देशमुख, रविंद्र बब्रुवान झाडे यांनी लंगर तोडुन भाविकांची श्रद्धा जोपासत पंरपरा कायम ठेवली .अंधश्रद्धा नसली तरी श्रद्धा असल्याचे आजच्या या कार्यक्रमातुन अनुभवायला मिळाले. संध्याकाळी आठ वाजता बँड लावुन वाजत गाजत व शोभेची दारू ऊडवित खंडोबा देवाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे कोरोनाने दुरावलेले गावकरी या यात्रेच्या निम्मित्ताने पुन्हा एकत्र आल्याचे पहावयास मिळाले.

COMMENTS